गुजरातमध्ये भारतीय तटरक्षक दल आणि गुजरातएटीएस यांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. एटीएस गुजरातसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत, भारताच्या तटरक्षक दलाने ९ पाकिस्तानी तस्करांसह 'अल हज' या पाकिस्तानी बोटीतून २८० कोटींचे हेरॉईन जप्त केले आहे. अरबी समुद्रात भारताच्या भारताच्या सागरी हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपासासाठी बोट जखाऊ येथे आणली जात आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत ही बोट जखाऊ बंदरावर आणण्यात येईल असं तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
प्राप्त माहितीनुसार ९ पाकिस्तानी तस्करांसह पाकिस्तानी बोट ‘अल हज’ काल रात्री उशिरा भारतीय सागरी सीमेत घुसली. तटरक्षक दलाची कुणकुण लागताच अमली पदार्थांची पाकिटे पाण्यात फेकून देत पाकिस्तानात परतण्याच्या प्रयत्न असलेल्या या बोटीचा पाठलाग करण्यात आला. त्यानंतर ही पाकिटे जप्त करण्यात आली. बोटीचा वेग वाढवण्यात येत होता. त्यामुळे बोटीला थांबवण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाला बोटीवर गोळीबार देखील करावा लागला.