मुंबई : आर्थिक परिस्थिती, पालकांचे दुर्लक्ष, व्यसने त्यात नेटवर्किंगचे वाढते जाळे यात अनेक अजाण बालके गुन्हेगारीच्या वाटेकडे वळताना दिसत आहेत.झोपडपट्टी, मध्यमवर्गीय घरांसह उच्चभ्रू वस्तीतील मुलेही सहज गुन्हे करताना सापडत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक बालगुन्हेगार हे पालकांसोबत राहणारे आहेत. त्यामुळे पालकांनी वेळीच सतर्क होत पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.एनसीआरबीच्या अहवालातून देशातील बालगुन्हेगारी हा चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, बालगुन्हेगारीत दिल्लीपाठोपाठ मुंबईचा दुसरा क्रमांक लागतो आहे. २०१९ मध्ये मुंबईत ६११ गुन्ह्यांची नोंद झाली. २०१८ (८६३) आणि २०१७ (९१४)च्या तुलनेत हा आकड़ा कमी आहे. या गुन्हेगारीत १६ ते १८ वयोगटातील बालकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. हत्या, वाहनचोरी, बलात्कार, चोऱ्या अशा एक ना अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकू पाहणाऱ्या बालकांना रोखणारी सामाजिक व्यवस्थादेखील लोप पावत आहे. उच्चभ्रू समाजातील मुलेही गुन्हेगार म्हणून पुढे येत आहेत. बालगुन्हेगारीची अनेक कारणे असली, तरी आपल्याला दिसणाऱ्या कारणांचा योग्य वेळी शोध घेऊन बंदोबस्त केल्यास बालगुन्हेगारीची समस्या काही प्रमाणात आटोक्यात आणणे शक्य असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
कायदा काय सांगतो? n १८ वर्षांखालील व्यक्तीकडून गुन्हा घडल्यास त्याला आरोपी नाही तर बाल अपचारी म्हटले जाते. त्याच्यावर केस चालवली जाऊ शकत नाही. त्याच्यावर आरोप असलेल्या गुन्ह्याची चौकशी ज्युवेनाईल जस्टीस बोर्डासमोर केली जाते.n त्यांना जेलमध्ये टाकता येत नाही. जरी चौकशीत दोषी आढळले तरी जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत सुधारगृहात पाठवण्याची तरतूद यात आहे.
सुधारित कायद्यानुसार १६ वर्षांवरील बाल अपचारी यांच्या गंभीर केसेस हत्या, बलात्कार या सत्र न्यायालयात चालवण्यात याव्यात अशी तरतूद आहे. बऱ्याच छोट्या गुन्ह्यांमध्ये बाल अपचारीला चौकशी न करता गुन्हा कबूल केल्यावर बॉण्ड भरून सोडून दिले जाते. असे सुटल्यामुळे त्याचा वाईट परिणामसुद्धा बऱ्याचदा होत असतो. - ॲड. प्रकाश साळसिंगीकर, विशेष सरकारी वकील