जमीर काझी मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आता एक दिवसावर येऊन ठेपल्याने प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्यात निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्याबरोबरच मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवळपास ११० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ११ हजारांवर जवानांचा समावेश असून मतदान होईपर्यंत त्यांना विभागवार नेमण्यात येणार आहे.गुरुवारी नक्षलग्रस्त भागात होणाऱ्या मतदानासाठी ८८ सुरक्षा कंपन्यांसह वायू दलाची एमएस-१७ ही तीन हॅलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत. येथील निवडणूक बंदोबस्तावर पर्यवेक्षण करण्यासाठी नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख अप्पर महासंचालक राजेंद्र सिंह तर गोंदियासाठी या अभियानाचे महानिरीक्षक शरद शेलार यांना नेमण्यात आले असल्याचे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४८ जागांसाठी चार टप्प्यांत मतदान होत आहे. या कालावधीत आचारसंहितेचा भंग न होण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी सर्व घटकप्रमुखांना विशेष सूचना केल्या आहेत. प्रत्येक मतदारसंघातील बंदोबस्तावर नियोजन करण्यासाठी पोलीस मुख्यालयात महानिरीक्षकांच्या समन्वयाखाली विशेष कक्ष तैनात करण्यात आला आहे. निवडणुकीच्या काळात सव्वा लाख पोलिसांशिवाय राज्य सुरक्षा दल, होमगार्ड आणि केंद्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या कंपन्यांना पाचारण करण्यात आले आहे. एका कंपनीत सरासरी १०० ते ११० जवानांचा समावेश असून अशा ११० कंपन्या राज्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत येथे कार्यरत राहणार आहेत.ज्या ठिकाणी मतदान होणार आहे, तेथील आयुक्तालय/ अधीक्षक कार्यक्षेत्रातील पोलिसांना तीन दिवसांच्या कालावधीतील साप्ताहिक सुट्टी व वैद्यकीय रजा वगळून अन्य रजा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय संबंधित हद्दीमध्ये निवडणूक होईपर्यंत नाकाबंदी लावली जाणार आहे.गडचिरोलीत सीआरपीएफच्या ३५ तर एसआरपीएफच्या २८ आणि गोंदियामध्ये सीआरपीएफच्या १५ तुकड्या तैनात केल्या आहेत.
राज्यातील जनतेने निर्भयपणे मतदान करून आपला हक्क बजवावा. निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची कसलीही तमा बाळगली जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश घटकप्रमुखांना देण्यात आलेले आहेत.- सुबोध जायसवाल, पोलीस महासंचालक