नवी दिल्ली - केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) मुख्य क्रीडा अधिकारी अर्जून पुरस्काराने सन्मानित जलतरणपटू खजानसिंग यांची महिला कॉन्स्टेबलने केलेल्या कथित बलात्काराच्या प्रकरणातून दिल्लीच्या न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. खजानसिंह टोकस हे काँग्रेस नेत्या चारूलता टोकस यांचे पती आहेत.
महिला कॉन्स्टेबलने आरोप केला होता की, खजानसिंग आणि सीआरपीएफचे कुस्ती प्रशिक्षक, निरीक्षक सरजित सिंह यांनी तिच्याकडे लैंगिक सुखाची मागणी करुन अनेकप्रसंगी बलात्कार केला. या दोघांवर सेक्स स्कँडल चालवल्याचा आरोपही तीने केला होता तसेच बलात्कार, लैंगिक छळ आणि धमकीचे आरोपही केले होते. आंघोळ करतानाचे नग्न फोटो काढून ते फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही तीने केला होता. मात्र, दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवताना महिलेने आरोप मागे घेतले.
खजानसिंह व त्यांच्या सहकाऱ्याला निर्दोष मुक्त करताना न्यायालयाने म्हटले आहे की, अभियोक्ताच्या साक्षीतून हे स्पष्ट होते की आरोपी व्यक्तींनी कोणत्याही वेळी बलात्कार केला नाही किंवा धमकी दिली नाही. जबाबात तक्रारदाराने कबूल केले की तिने आरोपी व्यक्तीविरोधात रागाच्या भरात तक्रार केली होती. आरोपींविरोधात काहीही दोषी आढळले नाही. तिला अनुशासनाच्या कारणावरून कुस्ती संघातून बाहेर काढले होते. याचा राग धरून तिने तक्रार केली. तक्रार दाखल करण्यासाठी या महिलेला तिच्या काही सहकाऱ्यांनी भडकावले होते, असे न्यायालयाने नमूद केले आहे.
ही महिला कॉन्स्टेबल २०१० साली सीआरपीएफमध्ये सामील झाली होती आणि सीआरपीएफच्या कुस्ती पथकाचा भाग असताना अनेक पदके जिंकली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या महिलेने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये दोघांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. खजानसिंह टोकस एक आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आहेत. १९८६ मध्ये आशियाई स्पर्धेत खजानसिंह यांनी कास्य पदक पटकावले होते. महिला सहकाऱ्याने केलेल्या बलात्काराच्या खोट्या आरोपाने त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रकार झाला परंतु न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.