शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात हायकोर्टातून जामीन मिळाला आहे. आर्यन खानचीही तुरुंगातून सुटका झाली आहे. आता याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा सविस्तर आदेश समोर आला आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, असा कोणताही पुरावा नाही, ज्यावरून आरोपीने हा गुन्हाचा कट रचला होता हे सिद्ध होतं. हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, आर्यन आणि अरबाज मर्चंट क्रूझवर स्वतंत्रपणे प्रवास करत होते, त्यांनी ड्रग्ज घेण्याची कोणतीही योजना आखल्याचा कोणताही पुरावा नाही.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. हे मान्य केले तरी या प्रकरणात कमाल शिक्षा एक वर्षाची आहे. सुमारे २५ दिवस आरोपी तुरुंगात आहेत. संबंधित वेळी त्याने अंमली पदार्थांचे सेवन केले होते की नाही हे ठरवण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नाही. आर्यन खानच्या व्हाट्सअॅप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाकडे ड्रग्ज सापडले. ते विकण्याजोगे नव्हते. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन, अरबाज मुनमुन यांनी ड्रग्ज विक्रीचा कट रचल्याचं दिसून येत नाही, अशी माहिती जामीन आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे.
आर्यन खानला २८ ऑक्टोबरला जामीन मंजूर झाला होताक्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात बंद असलेल्या आर्यन खानला २६ दिवसांनंतर २८ ऑक्टोबरला हायकोर्टातून जामीन मिळाला. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर आर्यन खानची ३० ऑक्टोबर रोजी तुरुंगातून सुटका करण्यात आली. हायकोर्टाने आर्यन खानला १४ अटींसह जामीन मंजूर केला होता.यामध्ये प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहून आपली उपस्थिती लावावी, अशीही अट होती. खटल्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत आर्यन खान परदेशात जाऊ शकणार नाही, असेही सांगण्यात आले.