हैदराबाद : तेलंगणामधून सायबर फसवणुकीचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यावसायिकाला दोन महिन्यांत दोन कोटी रुपयांचा फटका बसला आहे. एका कंपनीने व्यावसायिकाला भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून क्रिप्टो ट्रेडिंग पोर्टलमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. लोभापायी व्यावसायिक कंपनीच्या जाळ्यात अडकला आणि त्याचे मोठे नुकसान झाले.
मोठे नुकसान झाल्यानंतर व्यावसायिक राकेश (नाव बदलले आहे) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 6 मार्च ते 17 मे दरम्यान क्रिप्टो गुंतवणुकीद्वारे 2 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. ते म्हणाले, 6 मार्च रोजी त्यांचे फेसबुक पेज ब्राउझ करत असताना त्यांना बिटकॉइन ट्रेडिंगची जाहिरात दिसली. त्यानंतर त्यांनी जाहिरातीतील एक लिंक पाहिली आणि त्यावर क्लिक केले. ज्यामध्ये बिटकॉइन वेबसाइट लिंकसह व्हॉट्सअॅप चॅट पेजवर रिडायरेक्ट केले आणि वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
रजिस्ट्रेशन केल्यानंतर कंपनीचे अॅप डाउनलोड केले. यानंतर 6 मार्च ते 17 मे या कालावधीत 20.6 कोटी अमेरिकी डॉलर किमतीची यूएसडीटी खरेदी केली आणि फसवणुकीचा बळी ठरलो, असे व्यावसायिक राकेश यांनी सांगितले. तसेच, जेव्हा राकेस यांना त्यांचे पैसे काढायचे होते तेव्हा कंपनीने पैसे काढण्यास बंदी घातली आणि पैसे भरण्यास सांगितले.
दरम्यान, मी जमा केलेल्या रकमेच्या बदल्यात मला 10 कोटी रुपये मिळतील, अशी मला पूर्ण आशा होती, असेही पीडित राकेश यांनी पोलिसांना सांगितले. तसेच, कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी आयपीसी कलम 406 (गुन्हेगारी विश्वासघात), 419 (तोतयागिरी करून फसवणूक) आणि 420 (फसवणूक) आणि आयटी कायद्याच्या 66 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.