गरोदर पत्नी घटस्फोटा देण्यासाठी तयार होत नसल्यामुळे पतीने तिला HIVचं इंजेक्शन टोचल्याचा क्रूर प्रकार समोर आला आहे. विवाहबाह्य संबंध असणाऱ्या पतीने आपल्या पत्नीपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी हे अमानूष कृत्य केले. पत्नीने या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पतीचा शोध घेत आहेत.
उत्तर प्रदेशमधील अलिगड परिसरात राहणाऱ्या तरुणीची लगीनगाठ लग्न रामघाट रोड परिसरातील एका आरोग्य कर्मचाऱ्याशी बांधली. ७ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या या लग्नात त्यानं पत्नीच्या कुटुंबीयांकडून १२ लाख रुपये रोख आणि २५ लाखांचे दागिने तसेच इतर वस्तूंच्या स्वरुपात हुंडा घेतला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच त्याचे आणि पत्नीचे संबंध बिघडू लागले आणि दोघांत कटुता निर्माण झाली. पतीचे त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका आरोग्य कर्मचाऱ्यासोबत लैंगिक संबंध असल्याची बाब पत्नीच्या कानावर आली. याबाबत पतीला जाब विचारल्यानंतर त्यांच्यात खूपच खटके उडण्यास सुरुवात झाली. नंतर पतीने पत्नीला घटस्फोट देण्याची मागणी केली. मात्र, त्यावेळी पत्नीच्या आईवडिलांनी दोघांची समजूत काढून प्रकरण तात्पुरते थोपवले होते.पुन्हा काही दिवसांपासूर्वी पत्नी गर्भवती असल्याचं समजल्यावरही तिचा छळ करणं पतीने आणि सासरच्यांनी सुरुच ठेवला. तुमची मुलगी सतत आजारी पडत असल्यामुळे आपल्याला तिच्यापासून घटस्फोट पाहिजे असल्याचं पतीनं सांगितले. मात्र, ती गरोदर असल्यामुळे अधूनमधून आजारी पडत असेल, अशी समजूत पत्नीच्या आईवडिलांनी काढली. नंतर एक दिवस पतीनं HIVचं इंजेक्शनच पत्नीला दिलं. यामुळे तिला आणि तिच्या होणाऱ्या बाळालादेखील याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली. या प्रकाराने धक्का बसलेल्या पत्नीने वडिलांच्या मदतीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी महिलेचा पती आणि सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली असून पोलीस पतीचा शोध घेत आहेत.