रत्नागिरी : शहरातील आरोग्य मंदिर ते पटवर्धनवाडी परिसरातील सुमारे २१ श्वानांना खाण्यातून विष देऊन मारल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला़ हा सर्व प्रकार गुरुवारी सकाळी ६ वाजता उघडकीस येताच शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पाेलीस स्थानकात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. याबाबत प्राणीमित्र सुनील उदय डोंगरे (२३, रा. गाेडावून स्टाॅप, नाचणे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुनील डाेंगरे गुरुवारी सकाळी आरोग्य मंदिर ते पटवर्धनवाडी येथून जात असताना एका ठिकाणी श्वान मृतावस्थेत दिसले़ थाेडे पुढे गेल्यानंतर आणखी काही श्वान मृतावस्थेत असल्याचे त्यांनी पाहिले़ ते तसेच पुढे गेले असता आराेग्य मंदिर ते पटवर्धनवाडी या परिसरात तब्बल २१ श्वान मृतावस्थेत असल्याचे त्यांना दिसले़ या रस्त्यावर ठिकठिकाणी श्वानांना खाण्यासाठी चिकन व भात ठेवल्याचे त्यांनी पाहिले़ त्यानंतर त्यांनी याबाबत शहर पाेलीस स्थानकात फिर्याद दिली़.
त्यांनी दिलेल्या या फिर्यादीत कुणीतरी अज्ञाताने श्वानांना जीव मारण्याच्या उद्देशाने चिकन व भातामध्ये काेणते तरी विषारी औषध टाकून ते श्वानांना खायला दिले़ त्यामुळेच या श्वानांचा मृत्यू झाल्याचे डाेंगरे यांनी म्हटले आहे. या फिर्यादीनुसार पाेलिसांनी अज्ञातावर प्राण्यांना क्रुरतेने वागविणे अधिनियम १९६०चे कलम ११ (जी) (टी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे़ याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल लक्ष्मण कोकरे करत आहेत.
निर्बिजीकरण माेहीम बंदरत्नागिरी शहरात श्वानांचे प्रमाण वाढल्याने त्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. या मागणीनंतर रत्नागिरी नगर परिषदेने श्वानांचे निर्बिजीकरण करण्याची माेहीम हाती घेतली हाेती़. या माेहिमेवर आतापर्यंत ४६ लाख इतका खर्च करण्यात आला आहे. मात्र, गेल्या दाेन वर्षापासून काेराेनामुळे ही माेहीम बंद आहे़ त्यामुळे श्वानांचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. हत्या मागचे कारण काय?शहरात घरफाेडीपाठाेपाठ सायकल चाेरीचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्यावेळी हे चाेरटे फिरत असताना श्वान त्यांच्या मागे लागतात. श्वानांच्या आवाजाने नागरिक सतर्क हाेतात. त्यामुळे चाेरट्यांपैकीच काेणी या श्वानांना खाण्यातून विष दिले असावे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.