शैलेश कर्पे, सिन्नर (जि. नाशिक): सुमारे सहा महिन्यांपूर्वी वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण करण्यात आलेली पंधरा वर्षीय मुलगी शोधून काढत अपहरणकर्त्याच्या हातात बेड्या ठोकण्यात वावी पोलिसांना यश आले आहे. संशयित अनिल बाबासाहेब दिघे रा. तळेगाव दिघे यास धाराशिव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सहा महिन्यांपूर्वी १५ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी दिली होती. तिचा शोध लागत नसल्याने पालकांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी सूत्रे हलवून अपहरणकर्त्यास ताब्यात घेतले. संशयित अनिल दिघे याने पंधरा वर्षीय मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात दि. २१ सप्टेंबर २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून तपास करण्यात येत असल्याचे सांगितले जात होते. अपहरण करणारा संशयित अनिल दिघे हा मुलीसह बेपत्ता झाल्यापासून त्याचे नातेवाईक अथवा इतर कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे तपासात अडथळे येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. तर मुलीचे पालक व नातेवाईक यांच्याकडून तपासावर नाराजी व्यक्त केली जात होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात पालकांनी नाशिकला जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आत्मदहन करणार असल्याच्या इशारा दिला होता. त्यामुळे पोलीस यंत्रणेने तपासाला वेग घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर अधीक्षक माधुरी कांगणे यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांना दिले होते.
धाराशिव जिल्ह्यातून घेतले ताब्यात
निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास मोहीम राबवत सहाय्यक निरीक्षक लोखंडे व त्याच्या सहकाऱ्यांनी संशयित अनिल दिघे यांच्या विरोधातील तांत्रिक पुरावे जमा करण्यात यश मिळवले. त्यानंतर अवघ्या चारच दिवसात अपहरणकर्त्यासह मुलीला पोलिसांनी धाराशिव जिल्हयातून ताब्यात घेतले. या दोघांना सोमवारी (दि.२०) सकाळी वावी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलीस उपअधीक्षक तांबे यांनी समक्ष उपस्थित राहून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवून घेतला. त्या आधारे संशयित अनिल दिघे याचे विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को अंतर्गत तसेच विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले. त्यास अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक रामनाथ तांदळकर अधिक तपास करीत आहेत.