मुंबई - मुलुंड पूर्वेकडील नील टेलिकॉम शॉप या मोबाइलच्या दुकानात परदेशी महिला असल्याची बतावणी करून मोबाइल चोरी करणाऱ्या टोळीचा कारनामा दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. काल दुपारी मुलुंड पूर्व येथील फडके रोडस्थित नील टेलिकॉम शॉपमध्ये दोन महिला आणि एक सुशिक्षित उच्चभ्रू दिसणारी व्यक्ती आली. त्यांनी दुकानाचे मालक प्रकाश लोहार यांना ते परदेशी असल्याचे सांगत मनी एक्सचेंज करून देण्याची विनंती केली. या टोळीतील पुरुष मालकाशी बोलत असताना एक महिला दुकानातील कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवत राहिली तर दुसऱ्या महिलेने टेबलवर ठेवलेला महागडा मोबाईल हातचलाखी करून चोरी केला. कोणी पाहण्याआधीच तिने तिच्याकडे असलेल्या बॅगेत टाकला. काही वेळाने हे तिघेही दुकानात निसटले.परंतु, जेव्हा दुकानमालकाने मोबाइल मोजले. तेव्हा त्याला यातील एक महागडा मोबाईल नसल्याचे समोर आले. त्याने दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुकान मालकाला या चोरीचा उलगडा झाला. या प्रकरणी मालकाने नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून नवघर पोलीस या टोळीचा शोध घेत आहेत.
हातचलाखी करून मोबाइलची चोरी करणारी चोरटी महिला सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 3:05 PM