सुशांत कुंकळयेकर
मडगाव - साडेचार कोटी रुपयांच्या सिगारेट तस्करी प्रकरणात हात असल्याच्या वहिमावरुन कॉफेपोसाखाली स्थानबद्ध करण्यात आलेले कस्टमचे उपायुक्त महेश देसाई यांच्यासह पणजीतील व्यावसायिक परमिंदर छड्डा व वास्कोतील एजंट महमद शोएब या तिघांना स्थानबद्धतेतून मुक्त करण्याचा आदेश कॉफेपोसा पुनरावलोकन मंडळाने दिल्याने या तिघांचीही मुक्तता झाली.
सुत्रकडून मिळालेल्या माहितीप्रमाणो, या मंडळाने या तिघांनाही स्थानबद्धतेत ठेवण्यासारखे कुठलेही पुरेसे कारण मिळाले नसल्यामुळे त्यांची स्थानबद्धता हटविण्यात येत आहे असे पुनरावलोकन मंडळाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांचा समावेश असलेल्या मंडळाने काल शुक्रवारी हा निर्णय दिला.
मागच्या वर्षी कस्टमने पकडलेल्या विदेशी सिगारेट तस्करी प्रकरणात कस्टम उपायुक्त देसाई यांच्यासह अन्य दोघांचा हात असल्याचा दावा करुन 10 जानेवारी 2019 रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने कॉफेपोसाचे आदेश जारी केले होते. त्यानंतर या तिघांना ताब्यातही घेण्यात आले होते. या प्रकरणात आपल्याला विनाकारण अडकविल्याचा दावा देसाई यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणाचे पुनरावलोकन करण्यात आले. त्यात देसाई व इतरांविरोधात त्यांना स्थानबद्धतेत ठेवण्याचे कुठलेही ठोस कारण सापडले नाही.
यासंदर्भात तुरुंग अधिक्षकांच्या कार्यालयात संपर्क साधला असता देसाई व अन्य दोघांविरोधातील स्थानबद्धता मागे घेण्यात आल्याचा आदेश फॅक्सद्वारे आम्हाला पाठवून देण्यात आला आहे अशी माहिती मिळाली. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत या आदेशाचे पालन कसे करावे यासाठी तुरुंग निरीक्षकांच्या कार्यालयातून कॉफेपोसा पुनरावलोकन मंडळाकडे संपर्क साधण्यात आला होता.