मुंबई : मुंबई विमानतळावर ग्राउंड हँडलिंगचे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने ६० हजार डॉलर अंतर्वस्त्रात लपवून आणल्याचा प्रकार समोर आला आहे. हे पैसे तो दुबईला जाणाऱ्या एका प्रवाशाला देणार होता. त्याआधीच सीआयएसएफने त्याचा डाव हाणून पडला. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास टर्मिनल २ वर हा प्रकार उघडकीस आला. सीआयएसफकडून मुंबई विमानतळावर काम करणाऱ्या ग्राउंड हँडलिंग एजन्सीच्या कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू होती. त्यादरम्यान एका कर्मचाऱ्याने कपड्यांच्या आत काही तरी लपविल्याचे सीआयएसफ जवानाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याची कसून तपासणी करण्यात आली. त्याने अंतर्वस्त्रे आणि पायातील मोज्यांमधून परकीय चलन लपवून आणल्याचे आढळले. रितेश पारकर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, तो एव्हीया एक्सपर्ट या कंपनीत ग्राउंड हँडलिंग स्टाफ म्हणून कार्यरत आहे. त्याच्याकडून ६० हजार यूएस डॉलर्स इतके चलन जप्त करण्यात आले. त्याचे भारतीय बाजारमूल्य ४५ लाख इतके आहे. हे पैसे तो बोर्डिंग गेट क्रमांक ४६ वर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला देणार होता, अशी कबुली त्याने चौकशीदरम्यान दिली. त्यानंतर सीआयएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब गस्ती पथकाला कळवली. पारकरने दिलेल्या माहितीनुसार, गस्ती पथकाने बोर्डिंग गेट क्रमांक ४६ जवळून एका प्रवाशाला ताब्यात घेतले. सुफियान शाहनवाज शेख असे या प्रवाशाचे नाव असून, तो इंडिगोच्या ६ई-८२७१ या विमानाने दुबईला जाण्याच्या तयारीत होता. एअर इंटिलीजन्स युनिटकडे तपासदोन्ही आरोपींसह जप्त केलेले परकीय चलन सीमाशुल्क विभागाकडे सुपुर्द करण्यात आले. यापुढील तपास एअर इंटिलीजन्स युनिट करणार आहे. विमानतळावरील कर्मचाऱ्याकडे परकीय चलन आढळून आल्याने यंत्रणा अलर्टवर आल्या आहेत. परकीय चलन तस्कर टोळीशी या कर्मचाऱ्याचा संबंध आहे का, आणखी कोण कोण यात सहभागी आहेत, या दिशेने तपास केला जाणार आहे.महिलांच्या कपड्यामधून ड्रग्जची तस्करीमुंबई : महिलांच्या कपडयांंमधून इफेड्रिनचा साठा घेऊन पुण्याहून ऑस्ट्रेलियाला निघालेले पार्सल केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण पथकाने (एनसीबी) जप्त केले आहे. यामध्ये ३ किलो ९५० ग्रॅम इफेड्रिनचा साठा जप्त करण्यात आला आहे.अंधेरीतील पूर्वेकड़ून हे पार्सल जप्त करण्यात आले आहे. एनसीबीला याबाबत माहिती मिळताच, पथकाने कपडयांचे पार्सल जप्त केले. यामध्ये महिलांच्या विविध कपड्याआड हे ड्रग्ज लपवण्यात आले होते. पुणे येथून हे पार्सल ऑस्ट्रेलियाला रवाना होणार होते. मात्र, त्यापूर्वीच एनसीबीने ही कारवाई केली आहे. त्यानुसार, एनसीबीने गुन्हा नोंदवत, अधिक तपास सुरू केला आहे. अशाच प्रकारे अन्य ठिकाणीही एनसीबीची छापेमारी सुरू आहे.
अंतर्वस्त्रात लपवून आणले ६० हजार डॉलर; विमानतळावरील कर्मचाऱ्याचा सहभाग?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 7:51 AM