हैदराबाद-
हैदराबाद विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका विमान प्रवाशाविरोधात सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपीनं चक्क बुरख्यावर करण्यात आलेल्या नक्षीकामातील मोत्यांमध्ये सोनं लपवलं होतं. रविवारी हा प्रवासी दुबईहून हैदराबाद विमानतळावर जवळपास १८.१८ लाख किमतीचं ३५० ग्रॅम सोनं घेऊन पोहोचला होता. सोनं शेकडो मोत्यांमध्ये लपवण्यात आलं होतं आणि हे मोती एका बुरख्यावर लावण्यात आले होते.
हैदराबाद कस्टम्सने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती बुरख्यातून सोन्याचे मणी काढताना दिसत आहे. "हैदराबाद कस्टम्सने २७ फेब्रुवारी रोजी दुबईहून फ्लाइट क्रमांक FZ-439 मधील एका प्रवाशाविरुद्ध 18.18 लाख रुपयांच्या 350 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे. हे सोने बुरख्याला जोडलेल्या मोत्याच्या रूपात लपवले होते", असं सीमाशुल्क विभागाने म्हटलं आहे.
एका पुरुष प्रवाशानं त्याच्या चेक-इन बॅगेजमध्ये सोनं लपवलं होतं. हैदराबाद विमानतळावर सीमाशुल्क विभागाने सोन्याच्या तस्करीच्या अशा अनेक प्रकरणांचा पर्दाफाश केला आहे. जानेवारीमध्ये अधिकाऱ्यांना एका प्रवाशाच्या पट्ट्याखाली लपवून ठेवलेली ४७ लाख रुपयांची सोन्याची पेस्ट सापडली होती. याआधी सुदानमधील एका महिला प्रवाशाकडून 58 लाख रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं असून, तिनं हे सोनं तिच्या अंतर्वस्त्रांमध्ये आणि हँड बॅगेजमध्ये लपवलं होतं.