देशावर अज्ञात हॅकरनी मोठा सायबर हल्ला केला आहे. यामध्ये देशभरातील विविध सरकारी विभागांच्याव खासगी अशा ५०० हून अधिव वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्रातील ७० वेबसाईट होत्या. पैकी तीन सरकारी होत्या, असे महाराष्ट्र सायबर सेलचे एडीजी मधुकर पांडे यांनी सांगितले.
आज पहाटे चारच्या सुमारास ठाणे शहर पोलिसांची वेबसाईट हॅक झाली होती. या हल्ल्यामागे मलेशिया आणि इंडोनेशियाच्या हॅकरचा हात असल्याचा संशय आहे. अनेक वेबसाईट पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. उर्वरित वेबसाईट पुन्हा सुरु करण्याचे काम सुरु आहे. खासगी विद्यापीठाची वेबसाईट हॅक केल्यानंतर राज्यातील ७० हून अधिक वेबसाईटवर हॅकरनी हल्ला चढविला, असे पांडे म्हणाले.
देशात सध्या सुरु असलेल्या सामाजिक तणावामुळे अनेक सायबर हॅकरनी मिळून हा हल्ला केल्याचे पांडे म्हणाले. देशभरातील अनेक वेबसाईट हॅक झाल्या आहेत. मलेशिया आणि इंडोनेशियाच्या हॅकरची नावे समोर आली आहेत. ही टोळी भारतात सक्रीय आहे की नाही याबाबत अद्याप माहिती नाही, असेही ते म्हणाले.
ठाणेपोलिसांच्या सायबर सेलचे डीसीपी सुनील लोखंडे यांनी सांगितले की, आज पहाटे ४ वाजता वेबसाईट हॅक करण्यात आली. तंत्रज्ञांनी डेटा आणि वेबसाईट पूर्ववत केली आहे. तपास सुरु आहे. गृह विभागानेही सायबर सेलला या सायबर हल्ल्याच्या तपासाचे आदेश दिले आहेत.