पुणे : एकतर्फी प्रेमातून तरूणीचे इन्टाग्रामवरील खाते हॅक करून फोटो मॉर्फ करत तिची बदनामी करणाऱ्या तरुणाला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. रोहित राजेंद्र पाटील (वय १९, रा़ थळ, अलिबाग, रायगड) असे त्याचे नाव आहे.
पिंपरी चिंचवड परिसरातील मोहननगर भागात राहणाऱ्या एका तरुणीचे इन्स्टाग्राम खाते हॅक करून तसेच तिचे फोटो मॉर्फ करून अश्लिल फोटो तयार करत ते अपलोड करण्यात आले होते. याद्वारे तिची बदनामी करण्यात येत होती. त्यामुळे तरुणीने सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलिस आयुक्त निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलिस उपनिरीक्षक मंदा नेवसे, कर्मचारी भूषण शेलार, महिला कर्मचारी ज्योती दिवाणे यांच्या पथकाने तांत्रिक तपास केल्यावर हा प्रकार रोहित पाटील याने केल्याचे निष्पन्न झाले.
तो रायगड जिल्ह्यातील थळ येथे रहात असल्याचे आढळून आले़ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने हा प्रकार केल्याचे कबूल केले. तरुणी व रोहित पाटील एकाच गावातील राहणारे आहेत. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. तिचा काहीही रिस्पॉन्स मिळत नसल्याने त्याने तिच्या इन्स्टाग्राम खात्याचा अनधिकृतपणे अॅक्सेस मिळवला. त्यानंतर त्यावर तिचे फोटो मॉर्फ करून अश्लिल फोटो तयार करत त्या खात्यावर ते फोटो अपलोड करून तिची बदनामी करत होता. तसेच तिच्या मित्रांशी अश्लिल चॅटींग करत होता. असे तपासात समोर आले आहे.