चंडीगड - सायबर फसवणुकीचे हरयाणात चक्क प्रशिक्षणच दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याचा क्लास उघडला असून, त्यासाठी ४० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत फी वसूल केली जात आहे. नूंह जिल्ह्यात पकडलेल्या २०० सायबर ठकांची चौकशी सुरू असून, त्यातून ही माहिती बाहेर येत आहे. मेवात परिसरामध्ये घेतल्या जात असलेल्या कोचिंग सेंटरवर आता पोलिसांची नजर आहे.
सायबर फसवणुकीचे प्रशिक्षण देणाऱ्या क्लासेसनी अभ्यासक्रम ठरवण्याबरोबरच गणवेशही निश्चित केला आहे. विशेष म्हणजे अवैध कामांसाठी चालवले जात असलेले प्रशिक्षण ऑनलाइनही देण्याची व्यवस्था केली आहे. प्रशिक्षणासाठी प्रवेश घेण्यापूर्वी युवकांना प्रश्नोत्तराच्या मोठ्या प्रक्रियेतून जावे लागते. तुम्ही काम का करू इच्छिता, असे प्रश्न विचारले जातात. प्रशिक्षण घेणारे बहुतांश युवक बेरोजगार आहेत. पोलिस आता या प्रशिक्षण केंद्रांचा पर्दाफाश करण्याच्या तयारीत आहेत. नूंहमध्ये अलीकडेच ५००० पेक्षा जास्त पोलिसांनी एकाचवेळी १४ गावांत ३०० ठिकाणी छापेमारी केली.
इतर राज्यांत लागेबांधे? पोलिस अधीक्षक वरुण सिंगला यांनी सांगितले की, सायबर फसवणुकीचे प्रशिक्षण घेण्यासाठी युवकांकडे त्यांचा स्वत:चा लॅपटॉप व एखाद्या कॉल सेंटरमधील कामाचा अनुभव क्लासवाल्यांनी आवश्यक केलेला आहे. अटक केलेल्या युवकांच्या सिम कार्डमधून मिळालेली माहिती भारतीय सायबर क्राईम समन्वय केंद्राला पाठवण्यात आली आहे. या फसवणुकीचा इतर राज्यांतही काही लागेबांधे आहेत का, याची माहिती घेतली जात आहे.
अनेक जण गायब ४७ जणांना अटक केली होती व १६० जणांना ताब्यात घेतले होते. छापेमारीनंतर अटकेपासून बचाव करण्यासाठी अनेक युवक शेजारी जिल्ह्यांतील आपल्या नातेवाइकांकडे गेले आहेत.