फसवणूक करण्याच्या नवनवीन पद्धती तुम्ही ऐकल्या असतील, पण कानपूरमध्ये एक अशी गँग आहे जिने बँक अकाऊंट्स भाड्याने घेऊन कोट्यवधींची फसवणूक केली आहे. या गँगने जवळपास 1200 लोकांच्या बँक अकाऊंट्समधून कोट्यवधींची फसवणूक केली आहे. फसवणूक करणारे लोकांचं सेविंग अकाऊंट भाड्याने घेत असत. त्यानंतर ते या अकाऊंट्समध्ये फसवणुकीची रक्कम ट्रान्सफर करत असे. यानंतर फसवणूक करणारे या रकमेतील काही भाग ज्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवायचे त्यांना देत असत.
भाड्याने बँक अकाऊंट्स घेऊन फसवणूक करणाऱ्या या गँगला कानपूरमधून पकडण्यात आले आहे. याप्रकरणी बंगळुरूमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर, बंगळुरू पोलिसांनी कोहना पोलीस स्टेशन गुन्हे शाखेच्या सहकार्याने कारवाई करत, भाड्याने घेतलेल्या बँक अकाऊंट्सद्वारे फसवणूकीची रक्कम ट्रान्सफर करणाऱ्या टोळीतील दोन जणांना अटक केली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.
17 नोव्हेंबर 2023 रोजी हालसी रोड येथील ICICI बँकेतील अकाऊंटमध्ये 1 कोटी 20 लाख रुपये जमा झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या 1 कोटी 20 लाख रुपयांपैकी 1 कोटी 11 लाख रुपये वेगवेगळ्या अकाऊंट्समध्ये ट्रान्सफर करण्यात आले. या माहितीवरून कोहाना पोलीस ठाण्याचे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे तपास सुरू केला. शुभम तिवारी आणि शिवम यादव या दोन आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
गँगचे सदस्य अकाऊंट असलेल्या लोकांकडे ओटीपी मागून त्यांची फसवणूक करत असल्याचे समोर आलं आहे. फसवणुकीची रक्कम अकाऊंटमध्ये जमा केली जायची यानंतर ते ती रक्कम भाड्याने घेतलेल्या सेविंग खात्यात ट्रान्सफर करायचे. आतापर्यंतच्या तपासात या लोकांनी सुमारे 1200 लोकांचं सेविंग अकाऊंट भाड्याने देऊन त्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्सफर करण्याचे काम केल्याचं समोर आलं आहे.
आनंद प्रकाश तिवारी यांनी सांगितलं की, पोलीस स्टेशनमध्ये फोन आल्यानंतर एका महिलेची ओटीपी मागवून 4,24,000 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती मिळाली. बंगळुरू पोलीस कानपूरला पोहोचल्यावर त्यांनी दोन्ही आरोपींची चौकशी करून त्यांना बंगळुरूला नेलं. पण आता ज्यांच्या अकाऊंटमध्ये फसवणुकीची रक्कम ट्रान्सफर झाली, अशा लोकांवर कारवाई करायची का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कारण ते पैसे ट्रान्सफर करण्यासाठी विविध अकाऊंट्सचा वापर करायचे.