सायबर गुन्हेगाराने खासदारालाही आपल्या जाळ्यात अडकवल्याची घटना आता समोर आली आहे. एक फोन आला आणि खासदाराच्या खात्यातून जवळपास एक लाख रुपये गेले. द्रविड मुनेत्र कषगम (DSK) खासदार दयानिधी मारन यांनी तक्रार दाखल केली आहे की, त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला, त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून एक लाख रुपये काढण्यात आले.
दयानिधी मारन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी कॉल करणाऱ्या व्यक्तीसोबत कोणतीही माहिती शेअर केली नाही, तरीही त्यांच्या खात्यातून पैसे कापले गेले. माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, त्यांना 8 ऑक्टोबर रोजी एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. फोन कट करताच लगेचच त्याच्या बँक खात्यातून 99,999 रुपये कमी झाल्याचा मेसेज आला.
दयानिधी मारन यांनी सांगितलं की, त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. त्या व्यक्तीने आपण बँकेतून फोन करत असल्याचं सांगितलं आणि मारन यांच्याकडून व्यवहाराचे तपशील मागितले. मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खासदाराने कॉलरशी कोणतीही माहिती शेअर केली नव्हती. मात्र त्याच्या खात्यातून पैसे कापण्यात आले.
दयानिधी मारन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ज्या क्रमांकावरून कॉल आला होता त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय याप्रकरणी बँकेचीही मदत घेण्यात आली आहे. अलीकडच्या काळात सायबर फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढल्या आहेत.
सरकार याला तोंड देण्यासाठी विविध पावलं उचलत आहे. एक क्रमांकही जारी करण्यात आला आहे. सायबर फसवणूक झाल्यास, 1930 क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवता येईल. या नंबरवर तुम्हाला काही महत्त्वाची माहिती द्यावी लागेल. cybercrime.gov.in वरही ऑनलाईन तक्रार नोंदवता येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.