पैशांच्या फसवणुकीच्या अनेक घटना सतत समोर येत असतात. अशीच एक मोठी आणि डोळ्यात अंजन घालणारी घटना समोर आली आहे. यूपीच्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील सूरजपूरमध्ये ही घटना घडली असून एका महिलेकडून ८ लाख ३० हजार रूपये लाटण्यात आले आहेत. इथे एका महिलेला तिच्या बहिणीचा मेसेज आला की, तिला ८ लाख ३० हजार रूपयांची गरज आहे. महिलेने कशाचाही विचार न करता लगेच बहिणीच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले. नंतर तिला समजलं की, तिच्या बहिणीने तिला मेसेज केलाच नाही.
ही घटना फोन हॅक करण्याची आहे. महिलेच्या बहिणीचा फोन हॅक करून पैशांची ही फसवणूक करण्यात आली आहे. पीडित व्यक्तीने सायबर सेलमध्ये यासंबंधी तक्रार नोंदवली आहे. सूरजपूरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, मनोज अयोध्यावासी नावाची एक व्यक्ती त्यांच्याकडे आली होती त्याने पोलिसात तक्रार नोंदवली आहे.
तक्रारीत त्याने सांगितलं की, त्याच्या मेहुणीच्या फोनवरून त्याच्या पत्नीच्या फोनवर मेसेज आला होता. त्यात लिहिलं होतं की, मेहुणीला ८ लाख ३० हजारांची गरज आहे. पत्नीने मेसेजमध्ये पाठवलेल्य अकाऊंट डिटेल्सवर पैसे पाठवले. त्यानंतर समजलं की, मेसेज मेहुणीने केलाच नव्हता.
पोलिसांनी तक्रारीनंतर तपास केला असता समोर आलं की, महिलेने पाठवलेली रक्कम बंटी राम नावाच्या एका व्यक्तीच्या अकाऊंटमद्ये जमा झाली होती. पोलीस पुढील चौकशी करत आहेत. दरम्यान, या घटनेवरून हे लक्षात येतं की, आपल्या जवळच्या लोकांनाही पैसे पाठवताना शहानिशा केली गेली पाहिजे. घाई करून चालणार नाही. कुणालाही पैसे पाठवण्याआधी एकदा खातरजमा केली पाहिजे.