मुंबई - टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री(Cyrus Mistry) यांच्या अपघाताबाबत लग्झरी कार कंपनी मर्सिडीज बेंजनं त्यांचा अंतरिम रिपोर्ट पालघर पोलिसांना सोपवला आहे. रस्त्यावरील दुभाजकाला धडक देण्याच्या ५ सेंकदआधी कारचा ब्रेक दाबण्यात आला होता असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. कारचं निरीक्षण करण्यासाठी मर्सिडीज बेंज कंपनीचे तज्ज्ञ सोमवारी हाँगकाँगवरून मुंबईला येतील.
पालघर पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले की, मर्सिडीज बेंजने त्यांचा अंतरिम रिपोर्ट पोलिसांना सोपवला आहे. अपघातापूर्वी कारचा वेग १०० किमी प्रतितास इतका होता. जेव्हा पुलावरील दुभाजकाला कार आदळली तेव्हा कारचा वेग ८९ किमी प्रतितास होता. रिपोर्टनुसार अपघाताच्या ५ सेकंदआधी कारचा ब्रेक दाबण्यात आला होता. स्थानिक आरटीओनंही रिपोर्ट सोपवला. त्यात दुर्घटनेत कारमधील ४ एअर बॅग्ज उघडल्या होत्या. त्यातील ३ चालकाच्या बाजूने तर एक बाजूच्या सीटवर होती असं त्यांनी सांगितले.
१२ सप्टेंबर रोजी मर्सिडीज बेंजच्या तज्ज्ञाचं पथक हाँगकाँगवरून मुंबईला येणार आहे. त्यावेळी कार हिरानंदानी यांच्या मर्सिडिज शोरुममध्ये ठेवण्यात येईल. निरीक्षणानंतर कंपनी त्यांचा अंतिम रिपोर्ट सादर करेल असं पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.
चौकशीचे आदेशया घटनेची माहिती मिळताच पालघरचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळी तसेच कासा उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. महामार्गावर सूर्या ब्रीजजवळ झालेल्या या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघा जखमींना गुजरातमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही गाडी महिला चालवत होती. चालक महिलेचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, अशी माहिती पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, या अपघाताच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. या अपघाताबाबत अधिक तपास कासा पोलीस करीत आहेत, अशी माहिती पोलीस अधिकारी सचिन नावाडकर यांनी दिली.कसा होता प्रवास?सायरस मिस्त्री हे पालोनजी मिस्त्री यांचे सुपुत्र होते. लंडन बिझनेस स्कूलमधघून त्यांनी आपलं शिक्षण घेतलं. त्यानंतर इंपीरिअल कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली. २००६ मध्ये सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे सदस्य बनले. त्यानतर २०१३ मध्ये त्यांच्याकडे टाटा समुहाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. परंतु २०१६ मध्ये झालेल्या वादानंतर त्यांना या पदावरून हटवण्यात आलं. याशिवाय सायरस मिस्त्री हे शापूरजी पालोनजी समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टरही होती. सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी मिस्त्री यांनी दोराबजी टाटा यांच्याकडून टाटा समूहातील १८.५ टक्के हिस्सा विकत घेतला होता.