प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे काल अपघाती निधन झाले. मिस्त्री यांच्या डोक्याला मार लागल्याचे पोस्ट मार्टेम अहवालात नमूद करण्यात आले आहे. या सायरस मिस्त्रींची कार ताशी १३०-१४० च्या वेगाने जात असताना ती पुलाला धडकली आणि त्यात मिस्त्री आणि त्यांच्यासोबतच्या एकाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे हो दोघेही मागच्या सीटवर बसले होते.
मिस्त्री यांच्या कारचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. मिस्त्री यांच्या कारने चरोटी चेक पोस्ट दुपारी २.२१ मिनिटांनी क्रॉस केले होते. त्यानंतर त्यांची कार २० किमीदूरवर डिव्हायडरला आदळली होती. पोलिसांना सुरुवातीच्या तपासात ओव्हरस्पीड, राँग साईडहून ओव्हरटेक केल्याने हा अपघात झाल्याचे समजले आहे.
अपघातानंतर सायरस मिस्त्री यांना जवळच्या कासा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. डोक्याला मार लागल्याने सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टर शुभम सिंह यांनी सांगितले. त्यांना मृतवस्थेतच हॉस्पिटलला आणण्यात आल्याचे डॉक्टर म्हणाले. मिस्त्री आणि जहांगीर पंडोले हे दोन्ही मृत गाडीच्या दुसऱ्या रांगेतील सीटवर बसले होते. ही कार अनाहिता पंडोले या प्रसिद्ध गायनॅकोलॉजिस्ट चालवत होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा पती डेरियस पंडोले देखील होता.
मिस्त्री आणि जहांगिर यांनी सीटबेल्ट लावलेला नव्हता. आता सीटबेल्ट लावल्याने आणि न लावल्याने काय होते, याचा एक व्हिडीओ आला आहे. जो सर्वांचे डोळे उघडेल. व्यावसायिक वाहनांसाठी सीटचे इंटिरियर डिझाइनिंग आणि उत्पादन घेणारी कंपनी पिनॅकल इंडस्ट्रीज लि.चे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. नेमके हेच सायरस मिस्त्री आणि विनायक मेटेंच्या अपघातावेळी झाले असेल, असा अंदाज आहे.
या व्हिडीओमध्ये मागच्या सीटवर डमी दोन व्यक्ती बसलेल्या दिसत आहेत. जेव्हा ही कार आदळते तेव्हा ज्या डमीने सीटबेल्ट बांधलेला नाही, तो समोरच्या सीटवरून काचेवर आदळताना दिसत आहे. तर ज्या व्यक्तीने सीट बेल्ट लावला आहे, तो त्याच्या सीटवरच बसलेला दिसत आहे.