सातारा - शहरातील भरवस्तीत असणाऱ्या ज्वेलर्सच्या दुकानावर सहा दरोडेखोरांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण करून दरोडा टाकला. ही घटना सोमवारी रात्री दोनच्या सुमारास घडली असून दरोडेखोरांनी २८ हजारांचे दागिने चोरून नेले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सदाशिव पेठेमध्ये राधाकृष्ण ज्वेलर्स या नावाचे दुकान आहे. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास धारदार शस्त्र हातात घेऊन दुकानासमोर आले. सुरक्षा रक्षक बाळकृष्ण गोडसे यांना मारहाण करत चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटले. त्यानंतर दुकानातील सुमारे २८ हजार रुपये किंमतीचा सोन्या चांदीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेनंतर सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुकानातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी गतीने सुरू केले आहे. दरोडेखोर शहरातून बाहेर गेले नसावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर रात्रभर नाकाबंदी सुरू असल्यामुळे प्रत्येक वाहन पोलिसांकडून तपासून सोडण्यात येत आहे. अशा प्रकारची कोणतीच संशयास्पद गाडी बाहेर गेली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली असून विविध ठिकाणी ही पथके रवाना झाली आहेत.