नाशिक : एका अज्ञात व्यक्तीने नाशिकरोडरेल्वे स्थानकाच्या जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यालगतच्या एटीएम केंद्रापासून एका सात महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. तिच्या काकानेच केवळ चक्क आठशे रुपयासाठी चिमुकलीचे अपहरण केल्याचे उघडकीस आले आहे. दादर रेल्वेपोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला आहे.
रेल्वे पोलिसांनी बालिकेला तिच्या कुटुंबियांकडे सोपविले आहे. नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतून शनिवारी बालिकेचे अपहरण झाल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित अपहरनकर्त्याने मुलीला नंदीग्राम एक्स्प्रेसमधून दादर रेल्वे स्थानकापर्यंत नेले. तेथे बालिकेसोबत तो उतरला असता त्याच्या हालचालींवरुन लोहमार्ग पोलिसांना संशय आला असता पोलिसांनी त्यास हटकले. यावेळी त्याने सुरुवातीला पती-पत्नीचे नाशिकरोड येथे भांडण झाल्यामुळे मी माझ्या या मुलीला घेऊन जात असल्याचा बनाव केला. मात्र लोहमार्ग पोलिसांनी अधिक तपास केला असता तो गोंधळला आणि फलाटावरच बालिकेला सोडून पळू लागला असता पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून पकडले. त्याची कसून चौकशी केली असता या संशयिताने त्याचे नाव राजु तेलोरे असल्याचे सांगितले आणि मूळ कागदपत्रे दाखविली. या मुलीच्या वडिलांनी ८०० रुपये दिले नाही म्हणून त्याच्या मुलीचे अपहरण केल्याचे त्याने सांगितले. राजू हा त्या बालिकेचा काका असल्याचे तपासात पुढे आले आहे.
आईच्या कुशीत तान्हुली सुखरुप दादर रेल्वे पोलिसांनी नाशिकरोड रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. रेल्वे पोलिसांनी नाशिकरोड पोलिसांशी संपर्क साधला असता त्या मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे सांगण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोईर यांनी दादर येथे जाऊन या मुलीला ताब्यात घेऊन तिच्या आईच्या ताब्यात दिले.