डॅडीला हवीय २८ दिवसांची संचित रजा; मुंबई हायकोर्टात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 04:38 PM2019-02-23T16:38:20+5:302019-02-23T16:39:47+5:30
त्याच्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने कारागृह विभागाला नोटीस बजावली.
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडीने कुटुंबाच्या भेटीकरिता २८ दिवसांची संचित रजा हवी आहे. त्यासाठी डॅडीनेमुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्याच्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने कारागृह विभागाला नोटीस बजावली.
डॅडी सध्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. कारागृहात असल्यापासून त्याने पत्नीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी, मुलाचे लग्न, आईचा मृत्यू अशाप्रसंगी वेळोवळी कधी संचित रजा, तर कधी फर्लो रजा घेतली आहे. आता पुन्हा डॅडीने कुटुंबियांच्या भेटीसाठी मुंबईत हायकोर्टात धाव घेत २८ दिवसांची संचित रजा मिळावी, अशी विनंती केली आहे. गवळीतर्फे वकील मीर नगमान अली यांनी बाजू मांडली. गवळीने २८ दिवसांची संचित रजा मिळावी, असा अर्ज विभागीय आयुक्तांकडे केला होता. परंतु, अर्ज फेटाळण्यात आल्याने त्याने आता हायकोर्टात धाव घेतली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने कारागृह प्रशासनाला नोटीस बजावली आहे.