वाशिम : शहरातील वृंदावन पार्कमधील एका फ्लॅटमधून तीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन अग्निशस्त्रांसह धारदार खंजीर जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी ही धडाकेबाज कारवाई केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ जून रोजी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांना रात्रगस्तीदरम्यान वाशिम येथील एक युवक त्याच्या अन्य दोन साथीदारांसह वृंदावन पार्कमधील एका फ्लॅटमध्ये विनापरवाना घातक अग्निशस्त्रे व धारदार शस्त्र बाळगून असल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून इमारतीत धाड टाकली.
फ्लॅटमधील तीन युवकांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता, अभिषेक उर्फ गोलू पवन खळबळकर (२८, काळे फैल, वाशिम) याच्याकडे एक पिस्टल मॅगझीनसह, मकसूद खान मकबूल खान (१९, चिपा मोहल्ला, दिल्ली गेट, चितोड, राजस्थान) याच्याकडे एक रिव्हॉलवर आणि आकाश बबन जाधव (२०, नागठाणा, ता.जि. वाशिम) याच्याकडे धारदार खंजीर आढळून आले.
ते जप्त करून तीन्ही आरोपींवर वाशिम शहर पोलिस ठाण्यात भादंविचे कलम ३, ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सोमनाथ जाधव व त्यांच्या पथकाने केली.
दोन आरोपी विशीच्या आतीलजवळ अग्निशस्त्रांसह धारदार खंजिर बाळगणाऱ्या तीन आरोपींपैकी दोन आरोपी केवळ १९ आणि २० वर्षे वयाची आहेत; तर तिसऱ्या आरोपीचे वय २८ वर्षे आहे. यावरून विशेषत: युवा पिढीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे पुन्हा एकवेळ सिद्ध झाले आहे.
राजस्थानचा खान वाशिमात कसा?स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलेल्या तीन आरोपींपैकी दोन वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. मात्र, तिसरा आरोपी मकसूद खान मकबूल खान हा राजस्थान राज्यातील चितोड येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तो राजस्थानातून वाशिमात आला कसा, याचा शोध पोलिस घेत आहेत.