लातूर : क्षुल्लक कारणावरून काकाच्या पाठीत खंजीर खुपसून खून केल्याची घटना लातूर शहरानजीक आर्वी गायरान येथे बुधवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलासह त्याच्या आईविरोधात दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आशा सुग्रीव कांबळे (वय ३८, रा. आर्वी गायरान, ता. लातूर) हे आणि बहीण निशा सुरेश कांबळे यांची एकमेकांसमोर घरे आहेत. दरम्यान, मयत सुग्रीव रामहरी कांबळे (वय ४२) हे आपले आधार कार्ड आणि बँकेची कागदपत्रे निशाकडे ठेवले होते, बुधवारी सकाळी ही कागदपत्रे मागण्यासाठी ते निशा कांबळे यांच्या घरासमोर गेले असता यावेळी क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली.
निशा कांबळे या म्हणाल्या, तुझे कागदपत्रे आमच्याकडे नाहीत म्हणून शिवीगाळ केली. शिवाय, भांडणाची कुरापत काढली. या वादाचे पर्यवसान कडाक्याच्या भांडणात झाले. यावेळी निशा कांबळे यांच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात काका सुग्रीव कांबळे यांच्या पाठीतच खंजीर खुपसला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुग्रीव कांबळे यांचा मृत्यू झाला.
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात मयताची पत्नी आशा सुग्रीव कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निशा सुरेश कांबळे आणि अल्पवयीन मुलाविरोधात गुर नं. ६३५ / २०२४ कलम १०३ (१), ३५२, ३ (५) बीएनएसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात...आर्वी गायरान (ता. लातूर) येथे खुनाची घटना घडल्यानंतर काही वेळात गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून संशयित आरोपी म्हणून निशा सुरेश कांबळे आणि तिच्या १६ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले असून, पोलिस अधिक कसून चौकशी करत आहेत.
मृतदेहावर रात्री झाले अंत्यसंस्कार...खुनाच्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांतसिंह राजपूत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचानामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. मयत सुग्रीव यांच्या मृतदेहावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
फिर्यादी अन् आरोपी आहेत सख्ख्या बहिणी...मयताची पत्नी आशा कांबळे आणि आरोपी निशा कांबळे या दोघी सख्ख्या बहिणी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघींची घरे आर्वी गायरान येथे समोरासमोर आहेत. त्यांच्यामध्ये बुधवारी आधार कार्ड आणि बँकेच्या कागदपत्रांवरून जोरदार भांडण झाले आणि निशाच्या मुलाने सुग्रीव यांच्या पाठीत खंजीर खुपसला. गंभीर जखमी झालेल्या सुग्रीवचा यात मृत्यू झाला.