मुंबई - दहीहंडी उत्सवादरम्यान वेगवेगळ्या नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात एकूण ४६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये बहुतेक गुन्हे हे ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत.
दहीहंडी उत्सवाच्या आयोजनासाठी गोविंदा पथके आणि आयोजकांना न्यायालयाने काही अटी आणि निर्बंध लादले होते. यामध्ये ध्वनी प्रदूषण, थरांची मर्यादा, कमी वयाचे गोविंदा, गोविंदाची सुरक्षा यांचा समावेश होता. मुंबईत अनेक ठिकाणी गोविंदा पथके, आयोजक यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात ४६ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
कुलाब्यामध्ये पास्ता लेन येथे दहीहंडीचा आवाज कमी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर येथील काही जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक होळकर जखमी झाले. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी नऊ जणांना अटक केली. यामध्ये चार पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे.