गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: सोनार शैलेंद्र पांडे (४६) यांच्या दुकानात शिरून थेट त्यांना गोळी घालत लुटपाट करा असे सांगत शूटर्सना पाठविणाऱ्या बंटी पाटीदार (२३) याच्यासह त्याचा साथीदार प्रमोद लखरिया (२२) याच्या मुसक्या देखील रविवारी दहिसर पोलिसांनी सुरतच्या पिठमपूर जंगलातुन आवळल्या आहे.पाटीदार हा हत्या आणि दरोड्याच्या घटनेच्या २५ दिवस आधी मुंबईत आला आणि त्याने रेकी करत मारेकऱ्यांना सर्व प्लॅन समजावला आणि तो मुंबईतून परतला होता. तर त्याचा साथीदार प्रमोद लखरिया याने या सर्वांना शस्त्र पुरविले. तसेच गोळीबार कसा करायचा, दरोडा कसा घालायचा, 'टार्गेट' पर्यंत कसे पोहोचायचे हे सर्व प्रशिक्षण दिल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. हे दोघे सुरतमधील पिठमपूर जंगलात लपल्याची माहिती दहिसर पोलिसांना मिळाली. त्यानुसार परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी एस स्वामी आणि दहिसरचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय मराठे, सहायक पोलीस निरीक्षक डॉ चंद्रकांत घार्गे, ओम तोतावार, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, अभिनय पवार आणि पथकाने सापळा रचत दोघांचा गाशा गुंडाळला. पाटीदारच्याच इशाऱ्यावरून लूट करण्याच्या उद्देशाने पांडेंची हत्या करणाऱ्या आयुष पांडे (१९), निखिल चांडाल (२१), उदय बाली (२१) चिराग रावल (२१) आणि अंकित महाडिक (२१) या पाच जणांना यापूर्वी सुरत जवळून अटक करण्यात आली होती. त्यानुसार आता याप्रकरणातीला अटक आरोपींची संख्या ७ झाली असुन त्यांची चौकशी पोलीस करत आहेत.