मेरठ: दाढी ठेवल्यानं एका दलित तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे. ठाकूर समाजाच्या एका व्यक्तीनं दलित तरुणाला शिवीगाळ केली. त्याच्यासोबत असलेल्या टोळक्यानं चाकूच्या धाकानं दलित तरुणाची दाढी कापली. रजत कुमार असं पीडित तरुणाचं नाव असून त्याचं वय २० वर्ष आहे. दाढी ही ठाकूरांची शान आहे. दलितांनी दाढी ठेवायची हिंमत करू नये, असं उच्चजातीच्या व्यक्तीनं रजतला धमकावलं.
घटना घडल्यानंतर ५ दिवसांनी रजतनं तक्रार दाखल केली. घटनेचा व्हिडीओ ठाकूर समुदायातील व्यक्तीनं व्हायरल केला. त्यानंतर पोलिसांनी सहा जणांसह रजतची दाढी कापणाऱ्या न्हाव्याविरोधात गुन्हे दाखल केले. या सर्वांविरोधात एससी/एसटी कायद्याच्या अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र अद्याप सातपैकी एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती सहारणपूरचे एसएसपी शिवासिंपी चनप्पा यांनी दिली.
रविवारी सकाळी ७ वाजता रजत गावातून चालला होता. त्यावेळी नीरज राणा, सत्यम राणा, मोकाम राणा, रिपंतू राणा, मॉन्टी राणा आणि संदीप राणा यांनी त्याला रोखलं. 'त्यांनी मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. माझ्या जातीवरून त्यांनी अपशब्द वापरले. त्यांच्याकडे चाकू आणि इतर धारदार हत्यारं होती. त्यांनी मला खेचून सलूनमध्ये नेलं आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांना जबरदस्तीनं माझी दाढी कापली. मला मारहाण केली आणि या सगळ्याचं चित्रिकरण केलं,' अशा शब्दांत रजतनं घडलेला प्रकार सांगितला. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.