अमृतसर - जुन्या वादाचा राग मनात ठेवून एका दलित तरुणाला मारहाण करून मुत्रप्राशन करायला लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना पंजाबमधील अमृतसर येथे घडली असून, येथे एका 37 वर्षीय तरुणाला खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. नंतर त्याला मुत्रप्राशन करण्यास भाग पाडण्यात आले. पीडित तरुण हा छांगलीवाला गावातील रहिवासी असून, रिंकू आणि अन्य काही जणांसोबत त्याचा वाद होता. याबाबत पीडित तरुणाने सांगितले की, सात नोव्हेंबर रोजी रिंकूने वादासंदर्भात बोलण्यासाठी मला आपल्या घरी बोलावले होते. तिथे पोहोचल्यावर चार जणांनी मला मारहाण करून खांबाला बांधले. त्यानंतर पिण्यासाठी पाणी मागितले असता त्यांनी मला मुत्रप्राशन करण्यास भाग पाडले. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात भादंविमधील विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार निवारण अधिनियमांतर्गत लेहला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाबमधील मागासवर्ग आयोगानेही या प्रकाराची गंभीर दखल घेत संगरूरच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना या प्रकरणी अहवाल देण्यासा सांगितले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारावर आम्ही या प्रकरणाची दखल घेत पोलीसांकडून अहवाल मागवला आहे, असे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षा तेजिंदर कौर यांनी सांगितले.
संतापजनक! दलित तरुणाला मारहाण करून मुत्रप्राशन करण्यास भाग पाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 8:35 AM