प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: ऑनलाईन घेतलेले ५० हजारांचे कर्ज फेडण्यासाठी ज्वेलर्समध्ये काम करणा-या नोकराने मालकाने होलमार्क करण्यासाठी दिलेले सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरूवारी घडली होती. दरम्यान रामनगर पोलिसांनी या गुन्हयाचा कसोशीने तपास करीत पसार झालेल्या नोकराला ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून अटक केली. त्याच्याकडून १२ लाख ७२ हजाराचे दागिने जप्त केले आहेत. विक्रम गोपाळ रावल (वय २८ ) रा.डोंबिवली असे अटक आरोपीचे नाव आहे.
पुर्वेकडील आगरकररोड परिसरात राहणारे बसंतीलाल चपलोत यांचे नेहरू रोड याठिकाणी प्रगती ज्वेलर्स शॉप आहे. त्यांच्या दुकानात गेले वर्षभरापासून काम करणारा विक्रम रावल याच्याकडे मालक बसंतीलाल यांनी १२ लाख ७२ हजारांचे सोन्याचे दागिने होलमार्क करण्यासाठी दिले होते. संध्याकाळी पाच वाजता दिलेले दागिने घेऊन होलमार्क करण्यासाठी दुकानाबाहेर पडलेला विक्रम बराच वेळ लोटूनही दुकानात परतलाच नाही. बसंतीलाल यांनी मोबाईल केला असता त्याचा फोन स्वीच ऑफ येत होता. अखेर संशयावरून त्यांनी रामनगर पोलिस ठाणे गाठले आणि याबाबतची तक्रार दिली. रामनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश सानप, पोलिस उपनिरिक्षक अजिंक्य धोंडे, पोलिस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, नितीन सांगळे, निसार पिंजारी आणि अन्य पोलिस कर्मचा-यांचे पथक गुन्हयाच्या तपासकामी नेमले होते. पथकाने सीसीटिव्ही आणि तांत्रिक मदतीच्या आधारे त्याच्या मागावर जात आरोपी विक्रमला ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून अवघ्या तीन तासात अटक केली.
कर्ज फेडण्यासाठी लावला होता तगादा
विक्रमने काही कामानिमित्त ५० हजार रूपये ऑनलाईन कर्ज घेतले होते. परंतू वेळेत तो फेडू न शकल्याने संबंधितांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला होता. अखेर या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याने हे चोरीचे कृत्य केले अशी माहीती प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सानप यांनी सांगितले.