डान्स बार बलात्कार प्रकरण : केरळच्या सचिवांच्या मुलाचा अटकपूर्व जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 04:01 PM2019-07-04T16:01:53+5:302019-07-04T16:19:59+5:30
ओशिवरा पोलिसांनी बिनॉय याच्यावर बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.
मुंबई - केरळच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सचिव कोदियारी बालकृष्णन यांचा मोठा मुलगा बिनॉय कोदियारी याला डान्स बार बलात्कार प्रकरणी बुधवारी दिंडोशी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
बिनॉय याने विवाह करण्याचे आमिष देऊन आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, नंतर त्याने हे आश्वासन न पाळून आपल्याला फसविले, अशी तक्रार मुंबईची रहिवासी व बार डान्सर हिने ओशिवरा पोलीस ठाण्यात केली. तिच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी बिनॉय याच्यावर बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.
अटक होईल, या भीतीने बिनॉय याने दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. बार डान्सरने केलेल्या तक्रारीनुसार, या प्रेमप्रकरणातून तिला एक मुलगा झाला आणि आता तो आठ वर्षांचा आहे. २००९ पासून त्यांचे प्रेमप्रकरण आहे. दुबईमधील एका बार हॉटेलमध्ये ती डान्स बारचे काम करत होती. बिनॉयचा विवाह झाला आहे. हे तिला आतापर्यंत माहित नव्हते. काही दिवसांपूर्वी तिने बिनॉयचे फसेबुक अकाउंट पाहिल्यानंतर तिला बिनॉय व त्याच्या पत्नीचे फोटो दिसले.
तक्रारदाराने आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी बिनॉय गेले कित्येक वर्षे तिच्या बँकेमध्ये ठरावीक रक्कम भरत असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यासाठी तिने न्यायालयात बँक स्टेटमेंटही सादर केले.
बिनॉयच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तिने आक्षेप घेतला. बिनॉयचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला, तर तिच्या व तिच्या मुलाच्या आयुष्यासाठी धोका निर्माण होईल. केरळमध्ये सध्या सत्तेत असलेल्या पक्षाच्या माजी गृहविभाग मंत्र्याचा मुलगा आहे. त्यामुळे तिच्या जिवाला धोका आहे, असा युक्तिवाद बार डान्सरच्या वकिलांनी केला.
बिनॉयच्या वकिलांनी आक्षेप घेतला. तक्रारदार बिनॉयला ब्लॅकमेल करण्यासाठी हे सर्व करत आहे, असा आरोप बिनॉयच्या वकिलांनी केला. पोलिसांनीही बिनॉयच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आक्षेप घेतला. मुलाची डीएनए चाचणी करून तो बिनॉयचा मुलगा आहे की नाही, याची पडताळणी केली जाऊ शकते. चौकशीकरिता बिनॉयच्या ताब्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत त्याने तपासास सहकार्य केले नाही. त्यामुळे त्याचा जामीन मंजूर करू नये, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, न्यायालयाने बिनॉय याचा २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला, तसेच तपासकामात सहकार्य करण्याचा आदेशही न्यायालयाने बिनॉयला दिला.