मीरा रोड : कोरोनाने हाहाकार माजवला असताना व लॉकडाऊन असतानाही काशिमीरा येथील मानसी ऑर्केस्ट्रा बारमध्ये आंबटशौकीन ग्राहकांची शनिवारी पहाटेपर्यंत मैफल रंगली होती. पोलिसांनी छापा टाकून ग्राहक व बार कर्मचारी अशा एकूण २१ जणांना अटक करून बारच्या दोन मालकांवर गुन्हा दाखल केला.काशिमीराच्या मीरा गाव नाका येथील मानसी बारमध्ये नाचगाणी सुरू असल्याची माहिती काशिमीराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांना मिळाली. हजारे यांनी सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र भामरे यांच्यासह राजेश पानसरे, दिनकर कोल्हे, जयदीप बडे, जयकुमार राठोड, अनिल नागरे, स्वाती देठे असे पथक शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास मानसी बारवर कारवाईसाठी पाठवले. पथकाने बारच्या मागील दरवाजाने आत प्रवेश केला असता, तेथे बारबाला अश्लील नृत्य करीत होत्या, तर ग्राहक नोटा उडवत होते. पोलिसांच्या पथकास पाहून सर्वांची झिंग उतरली. बारच्या सहा कर्मचाऱ्यांसह १३ ग्राहकांना पोलिसांनी अटक केली. बारमधील सहा बारबाला व एक तृतीयपंथी यांची सुटका करण्यात आली. यापैकी चार बारबालांना एका लहानशा गुप्त खोलीत लपवून ठेवले होते. सध्या राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. असे असले तरी हे डान्स बार कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहेत, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
२१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल- पोलिसांनी बारचा मालक रवी शेट्टी आणि श्याम कोरडे यांनाही अटक केली असून एकूण २१ जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेले ग्राहक हे मुंबईच्या विलेपार्ले, कांदिवली, अंधेरी, माटुंगा, एल्फिन्स्टन तसेच ठाणे भागातील रहिवासी आहेत. - आशिष जोशी, शैलेश झगडे, सुभाष झा, चिराग शाह, मयूर दाभोळकर, परेश मुजिंदरा, मौलिक शाह, जिग्नेश शाह, देविशंकर यादव, प्रकाश गनावत, रूपेश राठोड, भावेश पारेख, राजेश घारे अशी अटक केलेल्या ग्राहकांची नावे आहेत. बारमधून १ लाख ९१ हजारांची रोकड, दारूच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या.