कुख्यात अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमचा हस्तक दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकना याला राजस्थानमध्येअटक करण्यात आली आहे. दानिश चिकना मुंबईतील डोंगरी परिसरात ड्रग्जची फॅक्टरी चालवत होता. राजस्थान पोलिसांच्या मदतीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) दानिशला बेड्या ठोकल्या. तो डोंगरी येथील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध NCB कडे २ गुन्हे दाखल असून तो त्यात वॉन्टेड आहे. तर डोंगरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध ६ गुन्हे दाखल आहेत.
एनसीबीच्या म्हणण्यानुसार नुकत्याच मुंबईत छापेमारीच्या कारवाईदरम्यान एनसीबीने दाऊदचा साथीदार चिंकू पठाणला अटक केली. चिंकू पठाण याच्या चौकशीदरम्यान दानिश चिकनाचे नाव समोर आले होते. मुंबई एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा दानिशला अटक करण्यासाठी एनसीबीचे पथक ड्रग्जच्या फॅक्टरीत पोहोचले तेव्हा तो भिंतीवरुन उडी मारुन पळून गेला. पण एनसीबीचे पथक कायम प्रयत्नशील राहिले. दानिश चिकनाचे लोकेशन राजस्थानमध्ये सतत सापडत होते. जेव्हा एनसीबीच्या पथकाने दानिशला अजमेरमध्ये घेराव घातला, तेव्हा तेथूनही तो चकवा देऊन पळून गेले. पण नंतर कोटामध्ये दानिशचे ठिकाण सापडल्यावर कोटा पोलिसांना कळविण्यात आले आणि दानिशला अटक करण्यात आली.
डोंगरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर जवळपास सहा गुन्हे दाखल आहेत. खंडणी, हत्येचा प्रयत्न यासारख्या गुन्ह्यांत त्याचा समावेश आहे. तर एनसीबीच्या दोन गुन्ह्यात तो फरार होता.ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेता एजाज खान यालाही अटक केली आहे. कोर्टाने एजाझला 3 एप्रिलपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. मुंबईतील मोठा ड्रग पेडलर शादाब बटाटाला अटक झाल्यानंतर एजाजचे नाव या ड्रग्ज प्रकरणात समोर आले होते. एनसीबीच्या टीमला एजाज खान आणि बटाटा टोळीचे काही धागेदोरे सापडले होते, त्याची चौकशी केल्यानंतर अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे