बाबासो हळिज्वाळे
कोल्हापूर - जिल्ह्यातील कोगनोळी येथे एकाच रात्रीत पाच घरे फोडून घरातील व्यक्तींना मारहाण करून तीस तोळे दागिने व रोकड दरोडेखोरांनी लंपास केल्याची घटना रविवारी पहाटे घडली. येथील हणबरवाडी रोडवर असणाऱ्या रेणुका मंदिरानजीक शिक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी सी. वाय. पाटील यांची इमारत आहे. घरातील पाठीमागील दरवाजा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व घरातील पाटील, त्यांची पत्नी रेखा पाटील व मुलगी ऐश्वर्या घोरपडे यांना जबर मारहाण केली. त्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर घरातील तीस तोळे दागिने व रोकड लंपास केली. या घराबरोबरच गावातील इतरही आणखी काही घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. या घटनेमुळे कोगनोळीसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच चिकोडी विभागाचे पोलीस उपाधीक्षक बसवराज यलगार, मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्वानपथक व ठसे तज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. एकाच रात्रीत पाच ठिकाणी धाडसी दरोडा व कुटुंबातील सदस्यांना होणारी मारहाण यामुळे कोगनोळी व परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या मोठ्या दरोड्यातील दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे.