मंबई - दर्शना पवार...मार्च २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाली त्यानंतर रँकच्या आधारे तिला वन अधिकारी म्हणून पोस्टिंग मिळाली. दर्शना खूप आनंदात होती कारण या दिवसाची वाट पाहण्यासाठी तिने कठोर मेहनत घेतली होती. १० जून २०२३ ला पुण्यात तिच्या सत्कारासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. ज्या कोचिंग सेंटरमधून तिने प्रशिक्षण घेतले त्यांच्याकडून दर्शनाच्या यशाबद्दल हा सत्कार सोहळा होता. मात्र या कार्यक्रमाच्या २ दिवसानंतर दर्शना पवार बेपत्ता झाली.
खूप शोध घेतल्यानंतर जेव्हा तिचा थांगपत्ता लागला नाही तेव्हा पोलीस स्टेशनला बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवण्यात आली. चौकशीत तिच्या मित्रांनी सांगितले की, दर्शना तिच्या लहानपणीचा मित्र राहुल हंडोरेसोबत १२ जूनला ट्रेकिंगला गेली होती. त्यानंतर तिच्याबाबत काही कल्पना नाही. राहुल हंडोरेचा शोध पोलिसांनी सुरू केला मात्र तोही बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबाने राहुल गायब झाल्याची तक्रार नोंदवली होती. जवळपास ६ दिवसांनी १८ जूनला पुणे येथील राजगड किल्ल्याजवळ दर्शनाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला. तिची हत्या धारदार शस्त्रे आणि दगडाने ठेचून झाल्याचं दिसून आले. दर्शनाचा मृतदेह मिळाला पण अद्याप राहुल गायब होता. गुन्हेगार म्हणून पहिला संशय राहुलवरच गेला. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.
पोलिसांना मिळाला पहिला पुरावा
तपास वेगाने सुरू झाला तेव्हा पहिला सुगावा हाती आला. इंडियन एक्सप्रेस रिपोर्टनुसार, किल्ल्याजवळील एका गावाबाहेरील रेस्टॉरंटच्या सीसीटीव्हीत राहुल नजर आला. १२ जूनला या फुटेजमध्ये त्याच्यासोबत दर्शनाही होती. दोघेही बाईकने किल्ल्याच्या दिशेने जात होते. त्यानंतर काही वेळाने फुटेजमध्ये राहुल एकटा बाईकवरून परतताना दिसतो. आता पोलिसांनी राहुलच्या शोधासाठी पथके तयार केली. ४ दिवसांनी राहुल मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनला सापडला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत राहुलने त्याच्यावरील गुन्हा कबूल केला. राहुलनेच दर्शनाची हत्या केली होती. सुरुवातीला कटरने तिच्यावर हल्ला केला त्यानंतर दगडाने ठेचून दर्शनाची हत्या केली.
अखेर राहुलने असं का केले, लहानपणीच्या मित्राने इतक्या निर्दयीपणे तिला ठार का केले हे प्रश्न उभे राहिले. पोलीस चौकशीत समोर आलं की, राहुल आणि दर्शना एकमेकांना लहानपणापासून ओळखायचे. नाशिकच्या गावात राहुलच्या घरासमोर दर्शनाच्या मामाचं घर होते. बीएससी पूर्ण केलेला राहुल दर्शनाप्रमाणेच स्पर्धा परीक्षाची तयारी करत होता. या तयारीसाठी दोघे पुण्यात आले होते. राहुलने चारवेळा परीक्षा दिली परंतु त्याला यश मिळालं नाही. त्याचे वडील नाशिकमध्ये वृत्तपत्र विक्री करायचे त्याच्या घरची परिस्थिती हालाखीची होती. परीक्षेची तयारी करण्यासाठी तो पार्टटाईम फूड डिलिव्हरीचं काम करायचा. १२ जूनला दर्शनासोबत राहुल ट्रेकिंगला गेला.
याठिकाणी राहुलने दर्शनासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला मात्र तिने त्याला नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात राहुलने दर्शनाचा खून केला. तिच्या हत्येनंतर तो पुण्यात आला आणि तिथून वेगवेगळ्या ट्रेनने प्रवास केला. सर्वात आधी त्याने सांगलीला जाणारी ट्रेन पकडली. त्यानंतर गोवा, चंडीगड आणि अखेर पश्चिम बंगालमध्ये हावडा येथे गेला. या काळात त्याने मोबाईल बंद ठेवला होता. लोकांकडून उधारी फोन घेऊन तो घरच्यांशी संवाद साधायचा. पोलीस जेव्हा या नंबरवर कॉल करायची तेव्हा हे उघड व्हायचे. राहुल सातत्याने त्याचे लोकेशन बदलत राहिला. त्यात एकेदिवशी राहुल मुंबईतील अंधेरी स्टेशनवर असल्याचं पोलिसांना माहिती मिळाली. साध्या वेशातील पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर सापळा रचला. राहुल जसा अंधेरीला दिसला तेव्हा त्याला पोलिसांनी अटक केली. राहुलवर चार्जशिट दाखल झाली आहे.