नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडी येथील जाहीर सभेत महात्मा गांधी यांच्या हत्येस आरएसएस जबाबदार धरणारे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केल्याने भिवंडीतील आरएसएस कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात दाखल केलेल्या मानहानी याचिके वरील पुढील सुनावणी २२ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती राहुल गांधी यांचे वकील अॅड नारायण अय्यर यांनी दिली आहे .
गुरुवारी भिवंडी न्यायालयातील प्रथम वर्ग न्याय
दंडाधिकारी न्यायाधीश जे.व्ही. पलीवाल यांच्या न्यायालयात फिर्यादी राजेश कुंटे यांच्या तर्फे ऍड प्रबोध जयवंत व अॅड गणेश धर्गळकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर या याचिकेची सुनावणी घ्यावी असा तहकुबी अर्ज व युक्तिवाद केला. परंतु सदर प्रकरणास स्थगिती आदेश आले नसल्याने सदरचे प्रकरणी फिर्यादीचा पुरावा नोंदविण्या साठी २२ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी घेणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
तर राहुल गांधी यांची बाजू मांडणारे अॅड नारायण अय्यर यांनी देखील राहुल गांधी हे गोवा, पंजाब व उत्तरप्रदेश येथील निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याने त्यांचा देखील गैरहजेरीचा अर्ज दाखल केला असता न्यायालयाने अय्यर यांचा अर्ज मंजूर करीत पुढील सुनावणी २२ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.