पिंपरी : ऑनलाईन डेटिंग अॅपवरून एका महिलेशी झालेली ओळख तरुणाला महागात पडली आहे. संबंधित महिलेने तरुणाला भेटायला बोलावले. शितपेयातून गुंगीचे औषध देऊन तरुणाकडून सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि रोख आणि रोख रक्कम असा एकूण दीड लाखांचा ऐवज चोरून नेला. वाकड येथे १८ जानेवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास हा प्रकार घडला.
याबाबत आशिषकुमार बी (वय ३०, रा. चेन्नई) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला आणि फिर्यादी आशिषकुमार यांची बंबल या डेटिंग अॅपवरून ओळख झाली. त्यातून चॅट करत असताना आरोपी महिलेने तिला कामाची गरज असल्याचे सांगून फिर्यादीला भेटायला बोलावले.
वाकड येथे पुणे-मुंबई महामार्गावरील एका आलिशान हॉटेलमध्ये दोघे भेटले. त्यावेळी आरोपी महिलेने फिर्यादी आशिषकुमार यांना कोल्ड्रिंक्समधून गुंगीकारक औषध पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर फिर्यादी आशिषकुमार यांची ९० हजारांची सोनसाखळी, २५ हजारांची सोन्याची अंगठी, २० हजारांचा मोबाईल फोन आणि १५ हजारांची रोकड असा एकूण एक लाख ५० हजारांचा ऐवज घेऊन महिला पळून गेली.