लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : सध्या कोरोनाचे संकट असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू केले असून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे घरात राहून कुटुंब टीव्ही किंवा मोबाइलमध्ये व्यस्त असल्याचे पाहावयास मिळत आहे. भिवंडी शहरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १५ वर्षीय मुलगी टीव्ही पाहत असताना मोबाइलवर गेम खेळत होती. त्यावेळी आईने टीव्ही पाहत असताना मोबाइलवर गेम नको खेळू असे दरडावले. मात्र आई आपल्यावर रागावल्यामुळे या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना न्यू टावरे कम्पाउंड येथे रविवारी घडली.कोमल रवींद्र सलादल्लू (१५) हे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ती घरामध्ये टीव्ही पाहत होती. त्याचवेळी ती मोबाइलवर गेमसुद्धा खेळत होती. त्यावेळी तिची आई रेखा रागावली. त्याचा कोमलला राग आल्याने तिने पहिल्या मजल्यावर जाऊन सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कायदेशीर कारवाई केली.
तक्रार नाही आत्महत्या केलेल्या कोमल सलादल्लू हिचा मृतदेह स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या मुलीच्या आईने कोणतीही तक्रार दिली नसल्याने भोईवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.