अमरावती : तीन वर्षांपासून लग्न जुळले होते. मात्र, हुंड्यातील वाढत्या मागणीसाठी वरपक्षाकडून वारंवार दबाव टाकला जात होता. पैसा, प्लॉट व चारचाकी वाहनाकरिता तगादा सुरू होता. त्याला कंटाळून नियोजित वधूने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना नांदगाव पेठ ठाण्यात तक्रारीनंतर बुधवारी उघडकीस आली.अमरावतीनजीक बोरगाव धर्माळे येथील रहिवासी राजेश जगदीशप्रसाद सचान (४७) यांनी बुधवारी सायंकाळी नांदगावपेठ पोलिसांत वरपक्षाच्या वाढत्या मागणीमुळे मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आदित्य काशीप्रसाद पातालीय (२३), गयाप्रसाद श्यामलाल पातालीय (५३) व दोन महिला (सर्व रा. पुलगाव, जि. वर्धा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यानुसार मुलीचे तीन वर्षांपासून लग्न जुळले होते.मात्र, वर आदित्य हा नेहमीच फोनवर बोलणी करून मुलीला हुंड्याची मागणी करीत होता. नागपूरला प्लॉट व चारचाकी वाहन देण्यासाठी दबाव टाकत होता.याशिवाय अन्य आरोपी हे आदित्यला सहकार्य करीत होते. माझ्या मुलीच्या मृत्यूस आरोपी कारणीभूत असल्याची तक्रार सचान यांनी पोलिसांत दिलेली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम् ा ३०६, ३४, ३, ४ हुंडा प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आर.जे. चंदापुरे करीत आहेत.लग्नापूर्वी मुलीला वरपक्षाकडून हुंड्याची मागणी करण्यात आली. या तणावातून मुलीने जीवन संपविले. तिच्या मृत्यूला वरपक्ष कारणीभूत असल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी केली आहे. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.- कैलास पुंडकर, पोलीस निरीक्षक, नांदगावपेठ.
तरुणी ठरली हुंडाबळी, गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 4:43 AM