यूपीच्या बांदामध्ये हुंड्यावरून सासरच्या मंडळींनी छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 2 लाख रुपयांची वाढीव हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे पतीच्या मित्रांसोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप नवविवाहित महिलेने केला आहे. घरातील लोकही तिची छेड काढतात. विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी देतात. त्यानंतर तिला आता मारहाण करून घराबाहेर हाकलून देण्यात आले आहे.
पीडिता आणि तिच्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठून पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून पोलीस स्टेशन प्रभारींनी सासरच्या 9 जणांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हुंड्यासाठी छळ, विनयभंग, मारहाण आदी कलमान्वये सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपींचा शोध सुरू आहे.
थाना बबेरू परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की, त्यांनी मे 2022 मध्ये चित्रकूट जिल्ह्यात लाखो रुपये हुंडा देऊन आपल्या मुलीचं लग्न करून दिलं होतं. मात्र लग्न झाल्यापासून सासरचे लोक मुलीला हुंड्यासाठी त्रास देत होते. सासरचे लोक मुलीला सांगायचे - तुझ्या घरून 2 लाख रुपये आणि एक चेन आण, नाहीतर तुला मोलकरीण म्हणून ठेवू.
मुलीने आरोप केला आहे की, पती तिच्यावर इतरांशी संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असे. तसेच मला जीवे मारण्याची धमकीही देत असे. शेवटी सासरच्यांनी मुलीला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिलं. ज्यावर आता पीडितेच्या वडिलांनी पोलिसात तक्रार करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर सासरच्यांनी हे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.