नात्याला काळीमा! वृद्ध सासूला सुनेची अमानुष मारहाण; पतीला दिली धमकी, केला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 12:17 IST2025-04-05T12:16:35+5:302025-04-05T12:17:12+5:30
एका सुनेने ७० वर्षीय सासूला निर्दयी मारहाण केली. एवढंच नाही तर तिने तिच्या वडिलांना आणि भावाला बोलावून पतीलाही बेदम मारहाण केली.

नात्याला काळीमा! वृद्ध सासूला सुनेची अमानुष मारहाण; पतीला दिली धमकी, केला हल्ला
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सुनेने ७० वर्षीय सासूला निर्दयी मारहाण केली. एवढंच नाही तर तिने तिच्या वडिलांना आणि भावाला बोलावून पतीलाही बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पती आणि सासूने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ग्वाल्हेरमधील आदर्श कॉलनीमध्ये घडली. विशाल बत्रा याने त्याची पत्नी नीलिका बराच काळ त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे. विशालने तक्रारीत म्हटलं आहे की, नीलिका त्याची वृद्ध आई सरला बत्रा यांना घरातून बाहेर काढून वृद्धाश्रमात सोडण्यासाठी त्याच्यावर दबाव आणत होती, परंतु विशाल यासाठी तयार नव्हता. यावरून घरात वारंवार वाद होत होता.
घटनेच्या दिवशी विशाल कामावरून घरी परतला तेव्हा नीलिकाने तिच्या वडिलांना आणि भावाला फोन करून त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यांनी विशालला मारहाण केली. ७० वर्षीय सासू सरला बत्रा आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आल्या तेव्हा सुनेने तिचे केस धरले, जमिनीवर ढकललं आणि तिला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला.
सरला बत्रा यांनी सांगितलं की, त्यांची सून नीलिका अनेक महिन्यांपासून त्यांना वाईट वागणूक देत होती. दररोज शिवीगाळ आणि भांडणं होतात, पण घरात आणखी वाद नको असल्याने मुलाला कधीही काहीही सांगितलं नाही. जेव्हा माझ्या मुलाचा जीव धोक्यात होता, तेव्हा ती गप्प राहू शकली नाही. सुनेने मला जमिनीवर फेकलं आणि जीवे मारण्याची धमकीही दिली.
विशाल आणि सरला बत्रा यांनी इंद्रगंज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा नीलिकाचे वडील आणि भावाने त्यांना धमकावलं. या भीतीने आई आणि मुलगा गेल्या काही दिवसांपासून घर सोडून वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत. तो आता एसपी कार्यालयात पोहोचला आहे आणि न्यायाची मागणी करत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.