बंगळुरूमध्ये सोमवारी एका एसयुव्हीने अनेक वाहनांना ठोकर दिली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. एका व्यस्त रस्त्यावर हा अपघात झाला होता. यानंतर वाहन चालकाला अटक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या कारवर आमदारांच्या नावाचा स्टीकर लावण्यात आला होता.
पोलिसांनी या कारमध्ये आमदार नव्हते असे सांगितले आहे. तर चालकाचे नाव मोहन असे सांगितले आहे. आमदारांचा स्टीकर असल्याने पोलिसांनी सुरुवातीला अदबीने चालकाची चौकशी केली. तेव्हा त्याने ती कार भाजपा आमदार हरतालु हलप्पा यांच्या मुलीच्या सासऱ्याची असल्याचे सांगितले. चालक त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता.
ही एसयुव्ही कार आमदारांची मुलगी सुष्मिता हलप्पा हिचा सासरा आणि सेवानिवृत्त वन अधिकारी रामू सुरेश यांची होती. मोहन हा सुरेश यांच्याकडे कामाला होता. सुष्मिता ही मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहे तसेच ती किम्समध्ये काम करत होती. तिला आणण्यासाठी तो जात होता. यावेळी सिग्नलवर वेगात असताना कारचे नियंत्रण सुटले आणि कारने थांबण्य़ाऐवजी पुढील काही वाहनांना ठोकर दिली.
या एसयुव्हीने उडविल्याने दोन स्कूटर चालक गंभीर जखमी झाले. एकाची जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. या एसयुव्हीने दोन कार आणि तीन स्कूटरना उडविल्याचे पोलिसांनी सांगितले.