पूनम अपराज
मुंबईत ही लिलाव प्रक्रिया पार पडली असून रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये दाऊदची लिलाव झालेली मालमत्ता होती. १३ पैकी ७ मालमत्तांचा आज लिलाव पार पडला. याआधी दाऊदची मुंबईतील जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री केल्यानंतर आज त्याच्या मूळ गावातील म्हणजेच रत्नागिरीतील मालमत्तांचा लिलाव करण्यात आला.
केंद्र सरकारने या मालमत्ता ताब्यात घेऊन त्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार आज या मालमत्तांचा लिलाव पार पडला आहे. 'साफेमा'ने (स्मगलर्स फॉरेन एक्स्चेंज मॅनिपुलेटर अॅक्ट) एकूण १७ मालमत्तांचा लिलाव करण्यात आला आहे. वकील श्रीवास्तव यांनी मुंबके येथील दाऊद इब्राहिम मेन्शन म्हणजेच दाऊदचा बंगला (हवेली) खरेदी केली. ही हवाली २७ गुंठे जमिनीवर उभी आहे. हा बंगला श्रीवास्तव यांनी ११ लाख २० हजारांना तर २५ गुंठे जमीन ४ लाख ३० हजार रुपयांना खरेदी केला आहे. श्रीवास्तव यांनी २००१ साली झालेल्या दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावातून ताडदेव येथील ३०० चौ.फु. कमर्शियल गाळा २ लाख ५० हजारांना विकत घेतला होता. मात्र, दाऊदची बहीण हसीना पारकर यांनी कोर्टात धाव घेतली असून हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ आहे. श्रीवास्तव हे १९९७ ते २००८ साली शिवसेनेत कार्यरत होते. त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, दाऊदचा बंगला पडून मला नवीन बांधकाम करायचे असून तेथे सरकारच्या परवानगीने सनातन शिक्षण देणारी शाळा सुरु करण्याचा मानस आहे.
बंगला विकला ११ लाखांना, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या रत्नागिरीतील मालमत्तेचा झाला लिलाव
त्याचप्रमाणे वकील भूपेंद्र भारद्वाज हे देखील दिल्लीतील असून त्यांनी मुंबके येथील चार जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यांनी २७ गुंठे जमीन २ लाख ५ हजार ८००, १९. ३० गुंठे जमीन २ लाख २३ हजार ३००, २० गुंठे जमीन १ लाख ६२ हजार ५०० आणि १८ गुंठे जमीन १ लाख ३८ हजार रुपयांना आज लिलावात खरेदी केली आहे. भारद्वाज यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, मला या जमिनीवर दहशतवादाविरोधी फ्रंट (NGO) तयार करण्याची इच्छा आहे. मी २ नोव्हेंबरला खेडला कारने येऊन पाहणी केली आणि आज देखील लिलावाला मी प्रत्यक्ष हजर होतो.