Dawood Ibrahim: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या गँगचा एक महत्वाचा गँगस्टर आणि दाऊदचा निकटवर्तीय फहीम मचमच (Faheem Machmach) याचं कोरोनानं निधन झालं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार फहीमचा मृत्यू पाकिस्तानच्या कराचीमध्ये झाला आहे. पण दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख असलेल्या छोटा शकीलच्या दाव्यानुसार फहीम मचमच याचा मृत्यू पाकिस्तान नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेत झाला आहे. इतकंच नव्हे, तर फहीम मचमचचा मृत्यू कोरोनानं नव्हे, तर हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचा दावा छोटा शकीलनं केला आहे. फहीम मचमच याच्या विरोधात भारतात अनेक हत्या आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई क्राइम ब्रांच आणि दिल्ली पोलिसांचं विशेष पथक फहीम मचमच याच्या मागावर होतं.
फहीम मचमच बराच काळ पाकिस्तानच्या कराचीमध्ये वास्तव्याला होता. दाऊदचा अतिशय जवळचा हस्तक म्हणून तो ओळखला जात होता. डी कंपनीची मुंबईतील सर्व खंडणीखोरीची कामं फहीम मचमच हाताळत होता. भारतीय तपास यंत्रणांच्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षांपासून फहीम मचमच कराचीत राहात होता आणि दाऊदला मदत करत होता. पाकिस्तानची आयएसआय या गुप्तचर यंत्रणेच्याही तो संपर्कात असल्याचं समोर आलं होता. दरम्यान फहीम मचमचच्या मृत्यूच्या वृत्ताला मुंबई पोलिसांकडून दुजोरा मिळालेला नाही.
गेल्या महिन्यापर्यंत सक्रीय होता फहीम मचमचडी कंपनीचा गँगस्टर फहीम मचमच गेल्या महिन्यापर्यंत मुंबईत सक्रीय होता. जूनच्या अखेरीस घाटकोपरमधील एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी फोन आला होता. फोन करणाऱ्यानं त्याचं नाव फहीम मचमच असल्याचं सांगितलं होतं. २१ जून रोजी व्यापाऱ्यानं या फोनकॉलबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पण फोन करणारा खरंच फहीम मचमच होता का याचा तपास पोलीस करत होते. यातच फहीम मचमच याच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.