मुंबई - मुंबईत झालेल्या १९९३ साखळी बाॅम्ब स्फोटातील आरोपी आणि अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा जवळचा हस्तक शकील अहमद शेख उर्फ लंबूचा आज सकाळी हार्ट अटॅकने मृत्यू झाला. त्याच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू असताना हा मृत्यू झाल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा अतिशय खास हस्तक म्हणून शकील लंबू अंडरवर्ल्ड विश्वात परिचित होता. मुंबईत राहून शकील हा त्याचा सर्व कारभार सांभाळायचा. मागील अनेक दिवसांपासून त्याला ह्रदयाचा त्रास उद्भवला होता. त्यामुळे त्याच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान आज सकाळी अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. त्याला तातडीने उपचारासाठी अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याला हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
दाऊदच्या टोळीत छोटा शकील व्यतिरिक्त अन्य दोन शकील नावाचे हस्तक होते. त्यात शकील अहमद शेख हा उंचीने सर्वात मोठा असल्यामुळे त्याला लंबू हे टोपण नाव ठेवले होते. शकील लंबूचे १९९३ मध्ये झालेल्या बाॅम्बस्फोटात ही नाव होते. स्फोटक आणण्यासाठी पैसा पुरवणे, त्या स्फोटकांना सुरक्षीत ठिकाणी ठेवण्यात लंबूचा हात होता. त्याव्यतिरिक्त त्याच्यावर डझनभर गंभीर गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलिसांच्या विविध पोलीस ठाण्यात आहे.