मुंबई/ठाणे : मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याचा शुक्रवारी ताबा घेत त्याला अटक केली आहे. इक्बालच्या कोठडीसाठी ईडीने पीएमएलए कोर्टात अर्ज केला. त्यानुसार पीएमएलए कोर्टाने इक्बाल कासकरला २४ फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावली.
इक्बाल कासकरला ठाणे पोलिसांनी २०१७ मध्ये खंडणीच्या एका प्रकरणात अटक केली होती. या गुन्ह्यासंबंधित कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत. या कागदपत्रांच्या आधारे एनआयएने दाऊदशी संबंधित दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासात काही मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांबाबतची माहिती समोर आली होती. त्याआधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करत, मंगळवारी मुंबईत नऊ आणि ठाण्यातील एका ठिकाणी छापेमारी केली. त्यानुसार, ईडीने शुक्रवारी इक्बालचा ताबा घेत त्याला अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
ईडीच्या वकिलांनी न्यायालयात दिलेल्या माहितीत, इक्बालला २०१७ मध्ये खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली. इक्बालवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल असून, डी कंपनीची गँग हे चालवत असल्याचा आरोप आहे. दाऊद इब्राहीम कासकर हा इक्बालचा भाऊ असून, तो आंतरराष्ट्रीय गुंड आहे. भावासाठी खंडणीद्वारे त्याने अनेकांकडून पैसे उकळले आहेत. मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात या टोळीच्या विविध सदस्यांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. दाऊद हा टोळीचा म्होरक्या असून, हवालामार्फतही हे पैशांचा व्यवहार करतात. यातील इक्बाल कासकर हा एक मुख्य आरोपी असून, तपासासाठी सात दिवसांची कोठडी मिळावी, अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली.
घरचे जेवण देण्यास परवानगीदुसरीकडे, इक्बालचे वकील सुलतान खान यांनी युक्तिवाद करताना, इक्बाल कासकर हा दाऊदचा भाऊ असल्यामुळेच त्याला टार्गेट केले जात आहे. तरीही चौकशीत इक्बाल पूर्ण सहकार्य करेल. तसेच, इक्बाल हा अनेक आजारांनी त्रस्त असून, कोठडीत त्यांना वैद्यकीय औषध आणि घरचे जेवण देण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने त्याला परवानगी दिली आहे.