=ठाणे - कुख्यात गुंड दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला ठाणे न्यायालयाने उपचारासाठी जे. जे. किंवा सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचे आदेश दिले असताना इकबालवर सिव्हिल रुग्णालयात उपचार करण्यात आले. अगदी साध्या चाचण्या करुन इकबालची पुन्हा ठाणे कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. इकबालला जे. जे. रुग्णालयात नेत असल्याचे खोटं सांगून सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी आणलं असल्याचा इकबालच्या वकिलांचा आरोप आहे. इकबालला जे आजार आहेत त्याची चाचणी न करता इतर आजारांची चाचणी केल्याचा देखील वकिलांनी आरोप केला आहे. जेल प्रशासन न्यायालयाचे आदेश पाळत नसल्याने इकबालचे वकिल ठाणे न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार आहेत.
इकबाल कासकर याला खंडणीच्या तीन वेगवेगळ्या आरोपांखाली जानेवारी २०१८ मध्ये ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. इकबाल मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजाराने त्रस्त झाला आहे. त्याचप्रमाणे त्याच्या यकृताला इजा झाल्यामुळे, हातापायांना सूज आल्याचे त्याच्या वकिलांचे म्हणणे आहे.