ठाणे: व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी गेल्या पाच वर्षापासून ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये असलेला अंडरवल्र्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याला प्रकृती बिघडल्याने शनिवारी मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तिथे त्याच्या वेगवेगळया वैद्यकीय तपासण्या केल्याची माहिती सूत्रंनी दिली.
सोने चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी तसेच बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून करोडो रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी इकबाल याला पाच वर्षापूर्वी ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती. त्याच्यावर मोक्कांतर्गतही कारवाई केली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून इकबाल कासकर हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याला २० ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. तसेच छातीतही दुखू लागल्याची त्याने कारागृह प्रशासनाकडे तक्रार केली. याची गांभीर्याने दखल घेत कारागृह प्रशासनाने त्याला तातडीने मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी इसीजीसह अन्यही तपासण्या डॉक्टरांनी केल्याची माहिती सूत्रंनी दिली. त्याच्यावरील अन्यही काही वैद्यकीय चाचण्या करणार असल्याने त्याला रुग्णालयातच दाखल केल्याची माहिती ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी दिली.