- बापू सोळुंके
औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या सचिन अंदुरेच्या विरोधातील महत्त्वाचा पुरावा सीबीआयच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांकडून समजली. डॉ. दाभोलकर हत्येच्या आदल्या दिवशी (१९ आॅगस्ट २०१३) सचिनची साप्ताहिक सुटी होती, तर हत्येच्या (२० आॅगस्ट २०१३) रोजी तो कामाच्या ठिकाणी गैरहजर असल्याची खळबळजनक माहिती तपासात समोर आली.
याविषयी सूत्रांनी सांगितले की, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्र्रकरणी सीबीआयने औरंगाबादेतील कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता सचिन अंदुरे याला १६ आॅगस्ट रोजी अटक केली. तत्पूर्वी, मुंबई एटीएसने सचिनला १४ रोजी चौकशीसाठी नेले होते. त्याची तीन दिवस कसून चौकशी केल्यानंतर एटीएसने १६ रोजी सायंकाळी त्याला औरंगाबादेतील औरंगपुरा भागातील सासुरवाडीत आणून सोडले. सचिन हा त्याच्या भावासह सासुरवाडीत जेवण करीत असतानाच सीबीआयच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आणि मुंबईला नेले.
चौकशीनंतर त्याला डॉ. दाभोलकर यांच्या खूनप्रकरणी अटक केली. तो सध्या सीबीआयच्या कोठडीत आहे. सीबीआयचे पथक तेव्हापासून औरंगाबादेत तळ ठोकून आहे. सचिन निराला बाजार येथील एका कापड दुकानात नऊ ते दहा वर्षांपासून नोकरी करतो. त्याला कामावर ठेवल्यापासून दुकानमालकाने हजेरी रजिस्टर ठेवले आहे. त्याच्यासह कामावरील अन्य कर्मचारी नियमित हजेरी रजिस्टरवर सह्या करीत असतात.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी १९ आॅॅगस्ट २०१३ रोजी सचिनची साप्ताहिक सुटी होती. यामुळे तो त्यादिवशी कामावर उपस्थित नव्हता. २० आॅगस्ट रोजी दाभोलकर यांची हत्या झाली त्यादिवशी तो गैरहजर होता. यामुळे १९ आणि २० आॅॅगस्ट रोजीच्या हजेरी रजिस्टरवर त्याची स्वाक्षरीच नाही. हे रजिस्टर सीबीआयने जप्त केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
अंदुरेशी संबंधित लोकांची चौकशीदाभोलकर खूनप्रकरणी सचिनला अटक केल्यानंतर सीबीआयने त्याच्याशी संबंधित दहा ते बारा जणांचे जबाब नोंदविल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना नोटीस देऊन जबाब देण्यासाठी हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार अनेक जण जबाब नोंदवून आले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : सचिन अंदुरेला स्पॉटवर नेऊन सीबीआयने केला तपास